Thursday, February 19, 2026
HomeTop Newsआखेगणी-टोणपेवाडी येथे गावडे दाम्पत्याच्या अनोख्या छंदातून माळरानावर बहरले नंदनवन ; जावली...

आखेगणी-टोणपेवाडी येथे गावडे दाम्पत्याच्या अनोख्या छंदातून माळरानावर बहरले नंदनवन ; जावली तील युवा शेतकऱ्यांना नवी दिशा.

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील आखेगणी टोणपेवाडी येथील सौ.अलका व श्री भानुदास गेणू गावडे या दाम्पत्याने वैविध्य पूर्ण शेती करण्याच्या आपल्या छंदाला श्रमाची जोड देऊन उजाड डोंगर माळरानावर नंदनवन फुलवले आहे.या शेतकरी दाम्पत्याने आपल्या शेतात आता पर्यंत सुमारे पंचवीस प्रकारची फळझाडे , मसाल्याच्या तसेच विदेशी उत्पादन देणाऱ्या रोपांची लागवड केली आहे.त्यांच्या या अनोख्या शेतीचा प्रयोग जावली तालुक्यातील युवा शेतकऱ्याना मार्गदर्शक ठरणारा आहे.

         त्यांच्या या अनोख्या शेतीला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व प्रगतशील शेतकरी सयाजीराव शिंदे, श्रीरंग गलगले, सतीश रांजणे या शेतकरी मिञांनी भेट दिली.यावेळी भानुदास गावडे व सौ.अलका गावडे  यांनी या पाहुण्यांचे स्वागत आपल्या शेतातील उत्पादित काॅफी देऊन केले.

              आजकाल समाजात शेतीला दुय्यमस्थानी लेखलं जात असल्याचे अनेकदा प्रकर्षाने जाणवते.विषेशत ; शेती करणाऱ्या मुलांच्या लग्नाच्या वेळी ही समस्या प्रकर्षाने जाणवते.परंतू शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर शेतकरी हा राजाच नव्हे तर अनभिषिक्त सम्राट असल्याचा प्रत्यय येतो.गेल्या काही वर्षांत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन जावली तालुक्यातील युवा शेतकरी शेतीमध्ये वैविध्य पूर्ण प्रयोग करत आहेत.या युवा शेतकऱ्याना प्रेरणादायी आणि आदर्शवत असा शेती उत्पादनाचा उपक्रम गावडे यांनी आपल्या शेतात केला आहे.

            जावली तालुक्यात पांचगणीच्या पायथ्याशी महू धरणाजवळच्या डोंगर कपारीत वसलेले आखेगणी गावच्या पोटातील टोणपेवाडी ही छोटी वाडीआहे.धरण जरी या गावाच्या उशाला असलं तरीही ते पूर्ण नसल्याने अजुनही उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.परिणामी उदरनिर्वाह पूर्णपणे मुंबई सारख्या शहरांवर अवलंबून आहे.डोंगर उतारावरील मुरमाड माळरान असणारी जमीन.पण या जमिनीवर स्वप्नवत नंदनवन फुलवण्याचे धाडस भानुदास गावडे व त्यांच्या पत्नी अलका यांनी केले.

              सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ होता.त्यावेळी बाजारातून आंबे खरेदी करतानाही आर्थिक बजेटचा विचार करावा लागत होता.आणि त्याच वेळी आपल्या शेतात आमराई फुलवण्याची संकल्पना मनात आली असल्याचे गावडे यांनी सांगितले.त्यानंतर दापोली येथुन हापूस आंब्याची पंचवीस रोपे आणून लावली.पावसाळ्याचे चार महिने वगळता उर्वरित आठ महिने ही रोपे जगवण्याचे मोठे आव्हान होते.व्यवसायामुळे आपला बहुतांश वेळ मुंबईत जात होता.त्यामुळे ही रोपे जगवण्याचे पूर्ण श्रेय पत्नी अलका यांनाच जात असल्याचे त्यांनी सांगितले.

           वर्ष भरात आंब्याची रोपे डौलदार झाली.आणि माळरानाचा काया पालट झाला.त्यानंतर कुडाळी नदीवरून लिफ्टच्या माध्यमातून शेतात पाणी आणलें.व पुढें नवनवीन जातीची झाडे लावत गेलो.प्रत्येक प्रकारच्या वाहनांची लागवड हा प्रयोगच होता.परंतू त्यात यश मिळाले.

           दीड एकर शेतीच्या क्षेत्रात आंब्याचे सहा वाण,जांभळं,फणस,नारळाचे पाच वाण, सुपारी, लिची, काळीमिरी चे दोन वाण,तमालपञ, दालचिनी, वेलची, आॅलस्पाईस सिताफळ, शिकेकाई,चिकू,लिंबू,काजू, काॅफी  याशिवाय विदेशी असणारे , रोजअॅपल,फिनट बारबा फ्रुट, लोकट, अॅवोकोडा, स्टार अॅपल,पपनस,बारबा डोस चेरी,रेडजाम अशा सुमारे पंचवीस प्रकारची फळझाडे लागवड केली आहे.याशिवाय रिकाम्या जागेत, आलं,हळद,या सारख्या बागायती पिकांबरोबरच नियमित लागणार्या पालेभाज्या व फळभाज्यांचेही उत्पादन घेतले जाते.

          सध्या आंबा व चिकू बरोबरच काळीमिरी ,तमालपञ, शिकेकाई, यांचे पासून उत्पादन सुरू झाले आहे. यावर्षी दहा किलो काळीमिरी ,तमालपञ व शिकेकाई यांची विक्री केल्याची माहिती गावडे यांनी दिली.या शिवाय पुढील काळात विविध वनौषधीं वनस्पतींची लागवड करणार असल्याचा मनोदय गावडे दाम्पत्याने व्यक्त केला आहे.आपल्या शेतातील हे वैविध्य पूर्ण प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी येतात त्यांना शक्य तितके मार्गदर्शन करत असल्याचे भानुदास गावडे यांनी सांगितले.युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीत न गुरफटला शेतात नवनवीन प्रयोग केले पाहिजेत असे आवाहन गावडे दाम्पत्याच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.

        गावडे यांचा हा शेतातील प्रयोग सध्या अडचणीत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारा आहे.ऊस कोणता कारखाना नेईल . काही राजकीय अडचण येईल का.ऊसाचे पैसे मिळतील का अशा विचारात पडणार्या शेतकऱ्यांना नवीन दिशा देणारा आहे.बर्याचदा शेतात पीक मुबलक येते पण बाजारात भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.त्यामुळे युवा शेतकऱ्याने सतत प्रयोगशील राहिले पाहिजे.शेतात नवनवीन प्रयोग करुन आपल्या प्रगतीची दिशा आपणच शोधली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page