कुडाळ,
जावली तालुक्यातील वालुथ शाखा डाकघरातील शाखा डाकपालाने बचत व सुकन्या खात्यांतील रकमेचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 160/2025 भारतीय दंड संहिता कलम 406, 409, 420, 465 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खबर देणारे ज्ञानेश्वर संतराम डोंगरे (वय 37, रा. बाई, ता. बाई, जि. सातारा, सध्या रा. कात्रज, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी श्री. संजय गणपत चव्हाण (रा. वालुथ, ता. जावली, जि. सातारा) यांनी डाकघरातील आपल्या
शासकीय पदाचा गैरफायदा घेत खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.ही फसवणूक 19 फेब्रुवारी 2019 ते 26 मार्च 2024 या कालावधीत घडल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी चव्हाण यांनी बचत खाते (SB), सुकन्या समृद्धी खाते (SSA), तसेच मुदत ठेव (TD) खात्यांमध्ये ग्राहकांकडून पैसे स्वीकारले. मात्र, त्यांनी हे पैसे खात्यात जमा न करता फक्त पासबुकवर खोटी नोंद केली. काही प्रकरणांमध्ये त्यांनी बनावट मुदत ठेव पुस्तिका तयार करून खातेदारांचा विश्वास संपादन केला.
या प्रकारात एकूण ₹6,26,710 रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, चौकशीदरम्यान आरोपीने त्यापैकी ₹3,00,000 शासकीय खात्यात परत भरल्याचे समजते. मात्र उर्वरित ₹3,26,710 रक्कम भरण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या गैरप्रकारामुळे खातेदारांचा आणि पोस्ट खात्याचा विश्वासघात झाला असून, सरकारी निधीचा अपहार केल्याबद्दल आरोपीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. आर. दिघे हे करीत आहेत.