Thursday, February 19, 2026
HomeTop Newsतर या राजकीय पक्षाचे भविष्यात होऊ शकते मोठे नुकसान…..

तर या राजकीय पक्षाचे भविष्यात होऊ शकते मोठे नुकसान…..

वैचारिक आणि राजकीय मेळ घालणे आवश्यक    

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या तीन दशकांत भारतीय जनता पार्टीने (भाजप) महाराष्ट्रात आणि देशभरात अभूतपूर्व वाढ साधली आहे. १९८०-९० च्या दशकात केवळ काही टक्के मते आणि मूठभर जागा मिळवणारा हा राजकीय पक्ष आज सत्तेच्या सर्वोच्च पदावर पोहोचला आहे. या यशाच्या मुळाशी असलेले कार्यकर्ते आजही बहुसंख्य ग्रामीण व शहरी भागात कार्यरत आहेत. त्यांच्या अविश्रांत परिश्रमामुळेच पक्षाचे बूथ ते विधानसभा पातळीवरील संघटन मजबूत झाले.

मात्र आज पक्षात वैचारिक व राजकीय असे दोन प्रवाह तयार झाले आहेत. राजकीय भाजप सत्तेची पदे आणि फायदे उपभोगत आहे, तर वैचारिक भाजप आजही पक्ष वाढीसाठी जुन्याच पद्धतीने काम करत आहे. “कळस गाठला असला तरी पायरीला विसरू नका” ही भावना आता कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ झाली आहे. “आया रामांना मिळतोय मान, निष्ठावंत म्हणतोय जय श्रीराम” अशी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय हेतूने पक्षात येणारे ‘राजकीय’ नेते आणि विचारधारेचे पाईक असलेले ‘वैचारिक’ कार्यकर्ते यांचा योग्य समन्वय न साधल्यास भविष्यात हे भाजपसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.

पक्ष दुर्लक्षित असताना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून, स्थानिक समाजाचा विरोध सहन करून या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केला. मात्र आज परिस्थितीत बदल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेला एक व्यक्ती थेट उच्च पदावर विराजमान होतो, तर तीस वर्षे बूथवर काम केलेला कार्यकर्ता आजही फक्त पत्रके वाटण्यापुरता मर्यादित राहतो.

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील भाजपची वाढ मुख्यतः त्यांच्या भक्कम संघटनेमुळे झाली होती. पण गेल्या काही वर्षांत झालेल्या आघाडीच्या राजकारणामुळे आणि अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांच्या भरतीमुळे मूळ कार्यकर्त्यांची उपेक्षा प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळेच काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला किंवा त्यांच्यात निष्क्रियता वाढली.

याउलट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांमध्ये नवीन नेत्यांना महत्त्व मिळाले असले तरी, जुन्या कार्यकर्त्यांचा मान राखला गेला. भाजपमध्ये मात्र “सत्ता टिकवणे” या राजकीय धोरणामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष झाले.

भाजपची खरी ताकद सोशल मीडियावरील ट्रेंडमध्ये नसून गावोगावी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेत आहे. जर त्यांना दुय्यम स्थान दिले, तर पक्षाचे पायाभूत जाळे कमकुवत होईल. नवीन चेहरे आणून सत्तेची समीकरणे मजबूत करता येतील, परंतु जुन्या कार्यकर्त्यांचा विश्वास गमावल्यास भविष्यात निवडणुकांमध्ये यश मिळवणे कठीण होऊ शकते.

पक्षाला पायाभूत आधार देणाऱ्यांना विसरणारा कोणताही पक्ष दीर्घकाळ सत्तेत टिकला नाही, असा राजकीय इतिहास आहे. भाजपने वेळेत ही गोष्ट लक्षात घेतली तरच निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाळ टिकेल आणि संघटनेचा पाया अधिक मजबूत होईल.

असे असले तरी, राजकीय व्यवस्थापनामध्ये इलेक्टिव्ह मेरिट (निवडून येण्याची क्षमता) महत्त्वाचे असते. ज्या व्यक्तीकडे जनमताचे समर्थन आणि पुरेसे आर्थिक पाठबळ आहे, त्याला राजकारणात संधी मिळते. गेल्या काही वर्षांत राजकीय समीकरणे, जनतेच्या अपेक्षा आणि सामाजिक स्थित्यंतरांमध्ये मोठे बदल झाले आहेत. केवळ निष्ठा असून चालत नाही, तर जनमतही तितकेच महत्त्वाचे आहे. सत्तेत असल्याशिवाय वैचारिक दिशा देता येत नाही, त्यामुळे राजकारणात प्रसंगी तत्त्व आणि निष्ठा बाजूला ठेवून वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतात. गेल्या काही वर्षांत भाजपने आपल्या राजकीय वाटचालीत केलेले बदल याच राजकीय गणितावर आधारित आहेत. तरीही, जिथे शक्य आहे आणि जुन्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, तिथे त्यांना संधी देणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page