तिळाची स्निग्द्धता आणि गुळाचा गोडवा यामुळे स्नेह वाढविणारा सण – मकर संक्रातीचे विषेश महात्म्य

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोणताही सण हा आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करत असतो.इंग्रजी कँलेंडर वर्षानुसार जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांतीचा येतो.नवी उमेद, नव्या आशाआकांक्षा आणि स्नेह वाढविणार्या या सणा विषयीची माहिती असणेही तितकेच महत्वाचे आहे.
यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाल – १४ जानेवारी २०२१ गुरुवारी सकाळी ८.१४ ते दुपारी ४.१४ पर्यंत आहे.
आपल्या बहुतांश सणांना आयुर्वेद आणि विज्ञानाची जोड आहे. जानेवारी महिना हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो.अर्थात पर्यावरणातील बदलामुळे अलीकडच्या काळात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही परंपरेनुसार जानेवारी महिन्याच्या थंडीनुसार या महिन्यात शरीरात पुरेशी उष्णता निर्माण व्हावी या हेतूने तिळाचे महत्व अधिक आहे. म्हणुनच या महिन्यात किमान संक्रातीच्या निमित्ताने या दिवशी तिळाचे उटणे अंगाला लावून तिलमिश्रीत पाण्याने स्नान करावे,याशिवाय तीळ होम,तिलतर्पण,तिलभक्षण व तिलदान अशा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता पौराणिक कथेनुसार आपल्या हातुन नकळत घडलेल्या पापांचा नाशहोतो असे सांगितले जाते.
पौष महिन्यात ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रात सण हिंदू धर्मात साजरा केला जातो. हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो. फक्त प्रांत व भाषा व परंपरेनुसार त्याला वेगवेगळी नावे आहेत. तसेच साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.
मकर संक्रात शक्यतो दरवर्षी जानेवारी महिन्यात १४ तारखेला येते. परंतु बर्याच वेळी सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या वेळेनुसार एखादा दुसरा दिवस मागे अथवा पुढेही होत असतो.आणि या दिवसापासून सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ होतो.
यावर्षी पौष शु.१, शके १९४२ गुरुवारी सकाळी ८.१४ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. बव करणावर संक्रात होत असल्याने संक्रातीचे वाहन सिंह आहे तर उपवाहन हत्ती आहे. संक्रांतीने पांढरे वस्त्र परिधान केले आहे. हातात भृशुंडी घेतलेली आहे कस्तुरीचा टीळा लावलेला आहे. वयाने बाल असुन बसलेली आहे. वासा करिता चाफा घेतला आहे. अन्न भक्षण करत आहे. देव जाती आहे. भूषनार्थ प्रवाळ धारण केले आहे. वारनाव नंदा व नाक्षत्रनाव महोदरी आहे. पश्चिमेकडुन पूर्वेकडे जात असुन अग्नेय दिशेला पहात आहे .या दिवशी सर्वांनी आनंदी रहावे, कोणतेही वाईट विचार अथवा कुकर्म करु नये.या दिवशी नवे भांडे,गाईला घास,अन्न, तीळपात्र,गूळ,तीळ,सोने,भूमी,गाय,वस्त्र व घोडा यांचे यथाशक्ती दान करावे.
प्रथा व परंपरेनुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कुंभार समाज संक्रांतीसाठी मातीचे सुगड ( मडकी) बनवतात.पाच सुगड व त्यावर झाकणी असा एक खण असतो.त्याची संक्राती रुप मानून महिला वर्ग पूजा करतो.हे खण व पाणाचे विडे एकमेकींना दान देण्याची प्रथा आहे. यादिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन शुभेच्छा देतात. अनेकदा रुसवे फुगवे सोडुन एकत्र येतात. तर तीळगूळ घ्या गोडगोड बोला म्हणून कधीही न भांडण्याचे वचन देतात.
मकर संक्रात ते रथ सप्तमी पर्यंत हा सण असतो. या कालावधीत नवविवाहित जोडप्यांना साखरेच्या तीळाचे दागिने घालून सजवले जाते. हा एक धार्मिक आणि स्नेह वाढविणारा सोहळा असतो.त्याच प्रमाणे नवबालकांना तीळाचे दागिने घालून बोरनहान केले जाते.नवविवाहितांचे व बालकांचे साखरेच्या तिळाचे दागिने घालून फोटो काढले जातात.अनेक ठिकाणी पतंग महोत्सव साजरा केला जातो.असा हा आनंद घेऊन येणारा मकरसंक्रांत सण आहे.
