‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी’ ही आरती आपण आजवर कितीतरी वेळा म्हटली असेल. संगीतकार अजय-अतुल यांनी या आरतीचे गाणे केले आणि तिची मोहिनी अधिकच वाढली. नवरात्रीमध्ये घरोघरी देवीचे पूजन, स्तवन, कीर्तन आणि जागरण होईल, त्यावेळी ही आरती आवर्जून म्हटली जाते. ही पूजा केवळ आदिमायेची नाही, तर अखिल विश्वाला नवजीवन देणाऱ्या स्त्रीशक्तीची आहे. तिलाच समर्पित ही आरती…
दुर्गे दुर्गट भारी: संपूर्ण आरतीचा भावार्थ
दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी,
वारी वारी जन्ममरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी।।
महिषासुर, शुंभ-निशुंभ, मधु-कैटभ अशा असंख्य दैत्यांचा नाश करणारी देवी जगदंबा, तुझा जयजयकार असो. तू दानवांचा नाश करून देवांना, मानवांना आणि अखिल विश्वाला तारून नेलेस, तशीच करुणा आमच्यावरही कर. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सोडव. आमच्या आयुष्याचे ध्येय गाठण्याची आम्हाला शक्ती दे आणि आमच्या मार्गात येणाऱ्या संकटांचे निवारण कर.
देवीच्या शौर्याचे आणि स्त्रीशक्तीचे वर्णन
त्रिभुवन भुवनी पाहता, तूज ऐसी नाही, चारी श्रमले परंतु, न बोलवे काही,
साही विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागी पावसी लवलाही।।
हे त्रिपुरसुंदरी, तुझ्या अलौकिक तेजावर भाळून खुद्द असुरांनाही तुझ्याशी विवाह करण्याचा मोह आवरता आला नाही. परंतु, तू केवळ स्तुतीवर भाळणारी नाहीस, तू शौर्याला, पराक्रमाला मानणारी आहेस. तू दैत्यांना युद्धात पराजित करण्याचे आव्हान दिले. त्यांनी तुझ्या स्त्रीत्वाला कमी लेखण्याची चूक केली आणि आपलाच सर्वनाश ओढवून घेतला. तुझ्या कर्तबगारीचे वर्णन वाचताना आमची परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वाणी थकली. आमच्या ठायी असलेले षडरिपूदेखील तुझ्यासमोर नतमस्तक झाले. आता फक्त तू आम्हाला आपलेसे करून घे आणि तुझा वरदहस्त आमच्या शीरावर ठेव.
आईच्या कृपेने क्लेशांपासून मुक्ती
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडी, तोडी भवपाशा,
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन जाहला पदपंकजलेशा।।
कोणतेही मोठे संकट असो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आईकडे असतोच. तू तर समस्त विश्वाची जननी आहेस. तुझ्या केवळ दर्शनाने भक्तांना मोठा दिलासा मिळतो. तू सोबत आहेस, ही खात्री असली की संकट, दुःख आणि क्लेष यांना आयुष्यात थारा राहतच नाही. मन शांत झाले की भवपाशातून सुटका होणेही सोपे जाते. तरीसुद्धा आम्ही जर या मायाजाळात अडकून राहिलो, तर त्यातून सोडवायला तू जवळ आहेसच. `अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा?’ अतिशय तळमळीने, व्याकुळतेने आणि कृपाभिलाषी होऊन आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत. ज्याप्रमाणे लहान मुलाला क्षणभरही आपली आई नजरेआड झालेली चालत नाही, तशीच भक्तांनाही तू नजरेआड गेलेली चालत नाही.
तुझी प्रत्यक्ष भेट कधी होईल माहित नाही, तोवर मी माझ्या सभोवताली असलेल्या स्त्रिरूपातील तुझ्या अंशाचा नितांत आदर करेन. दुसऱ्यांना आदर करायला शिकवेन. माझी आई, बहीण, बायको, मैत्रीण आनंदी असेल, सुरक्षित असेल, तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे, तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन.


