Thursday, February 19, 2026
HomeTop News"देवपूजा आणि कुलधर्म  कुलाचार" श्रद्धा की अंधश्रद्धा : विवेकाचा दिवा पेटवूया

“देवपूजा आणि कुलधर्म  कुलाचार” श्रद्धा की अंधश्रद्धा : विवेकाचा दिवा पेटवूया

सूर्यकांत जोशी कुडाळ, 9421214450

             आजचा प्रश्न केवळ धर्माचा नाही, तर विवेकाचा आहे. आपल्याकडे देवपूजा, देवदर्शन, कुलधर्म आणि कुलाचार या परंपरा हजारो वर्षांचा वारसा घेऊन उभ्या आहेत. या परंपरा समाजाला दिशा देणाऱ्या, संस्कार जपणाऱ्या आहेत. पण त्या आंधळेपणाने पाळल्या गेल्या, तर त्या श्रद्धा न राहता अंधश्रद्धा होतात. वास्तविक देवपूजा करावी की नाही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे की नाही घरामध्ये धार्मिक विधी पूजाअर्चा करावे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला ज्या गोष्टीतून समाधान  मिळते ते करण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे.आत्मिक आणि मानसिक समाधान मिळणे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे.

श्रद्धा – उन्नतीकडे नेणारी
दररोज घरातील देवपूजा केल्याने किंवा स्तोत्र पठण करण्याने एखादी ग्रंथ पोथी वाचनाने किंवा देवळात केलेली प्रार्थना मनाला शांती देते, आत्मविश्वास वाढवते. कुलाचार आणि कुलधर्म माणसाला मूळाशी जोडून ठेवतात. समाज एकत्र येतो, नातेसंबंध घट्ट होतात. ही खरी श्रद्धा आहे – जी माणसाला सकारात्मकतेकडे नेते. माणसाचे सकारात्मक विचार त्याला यशाकडे नेत असतात किंवा यशाचा मार्ग दाखवत असतो. देव पूजा केल्याने किंवा देव दर्शनाने माणसाच्या मनात जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती त्याला त्याचे काम मनापासून करण्याची प्रेरणा देते आणि यातूनच त्याला यश मिळत असते. आणि मी करत असलेल्या चांगल्या कार्यात मला देवाच्या कृपेने यश मिळेल अशी त्याची भावना झालेली असते. यासाठी मनात श्रद्धा असणे किंवा विश्वास असणे हे महत्त्वाचे आहे.

अंधश्रद्धा – अध:पतनाची वाट
परंपरेच्या नावाखाली गैरसमज पसरवणे, भिती दाखवून पैसा उकळणे, प्राण्यांचे बलीदान देणे, रस्त्यात काळी मांजर गेली म्हणून मागे वळणे – या अंधश्रद्धा आहेत. यातून ना धर्म जपला जातो, ना भक्ती वाढते. उलट समाज अज्ञानात गुरफटतो. जर तुमचा विश्वास आणि श्रद्धा नसेल तर पूजाअर्चा देवदर्शन हे करण्याची गरज नाही. आणि तसा कोणी आग्रही करत नाही किंवा धर्मशास्त्रात अशी काय कोणावर सक्तीही केली नाही. त्यामुळे मी हे केलं नाही तर माझं नुकसान होईल अशी अंधश्रद्धाही ठेवण्याची काही गरज नाही. या उलट केवळ भीतीपोटी परंपरा आणि धर्मशास्त्राच्या बाबतीत असणाऱ्या अज्ञानामुळे माणूस अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकतो आणि अनावश्यक कर्मकांड करत बसतो यामध्ये कदाचित त्याचे आर्थिक आणि मानसिक नुकसानही होऊ शकते.

देवपूजा व कुलाचार का करावा
देवपूजा म्हणजे मनाचे शुद्धीकरण. देवदर्शन म्हणजे समाजभावना. कुलधर्म व कुलाचार म्हणजे परंपरेचा वारसा. हे सर्व माणसाच्या उन्नतीसाठी आहेत, पण विवेक गमावला तर त्याच गोष्टी अंधश्रद्धेत रूपांतरित होतात. देव तुम्हाला भौतिक गोष्टी देणार नाही. परंतु देवावरची श्रद्धा तुम्हाला यशाचा मार्ग दाखवते.

विवेकाचा दिवा पेटवण्याची वेळ
आजच्या विज्ञानयुगात प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे –
आपण खरोखर देवाची भक्ती करतोय का, की अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलोय? कधी वर्षभरात गावच्या मंदिरात न जाणारे किंवा घरातील देवाची पूजा न करणारे एखादा सण उत्सव म्हंटले की मीच खरा देवाचा भक्त असल्याचे देखावा करतात याला भक्ती म्हणायचं का. आत्मिक समाधान साठी असणाऱ्या भावनेने केलेली भक्ती ही श्रद्धा म्हणावे लागेल तर मी देवाचे काहीतरी करतोय आणि माझ्यामुळे हे सगळं घडतंय हे दाखवण्यासाठी केलेले उठा ठेव ही अंधश्रद्धा आहे.
श्रद्धा माणसाला मजबूत करते, तर अंधश्रद्धा गुलाम बनवते.

आपली संस्कृती जपायची असेल, तर परंपरा पाळूया पण विवेकासह. देवपूजा, देवदर्शन, कुलधर्म हे आवश्यकच, पण त्यांचा पाया तर्क, अनुभव आणि सकारात्मकता असला पाहिजे.
अंधश्रद्धेचे अंधार दूर करून श्रद्धेचा दिवा पेटवणे, हीच आज समाजासमोरील खरी जबाबदारी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page