सूर्यकांत जोशी कुडाळ – देशाला महागाईच्या खाईत लोटून तसेच शेतकरी विरोधी तोरणे राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार्या मोदी सरकारचा आगामी निवडणुकीत जनता कडेलोट करेल असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी केले.
कुडाळ ता. जावली येथे संविधान दिवस व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सभासद नोंदणी शुभारंभ. प्रसंगी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. प्रारंभी 26/11 च्या हल्यात शाहिद झालेल्या पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सोपानराव म्हस्के, प्रदेश प्रतिनिधी डाॅ.सुरेश जाधव, सरचिटणीस बाबुराव शिंदे,नरेश देसाई,अॅड.दत्ताञय धनावडे, तालुकाध्यक्ष विक्रम तरडे,संदिप माने,प्रकाश परामणे, जिजाबा निकम, शिवाजीराव गायकवाड, अमृतराव शिंदे,तानाजी रांजणे, बाबासाहेब साळेकर,अजय नलावडे, संदीप गोळे, अमोल शिंदे उपस्थित होते.
निरीक्षक श्रीरंग चव्हाण पुढे म्हणाले, काॅंग्रेस ही एक विचारधारा आहेदेशाला काॅंग्रेसचे विचारच पुढे नेऊ शकतात. निवडणुकित आघाडी केल्याने कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे तसेच पक्षाचेही नुकसान होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.काॅंग्रेसची विचारधाराच पक्षाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देईल.जे सध्या काॅग्रेसमध्ये आहेत तेच खरे मावळे आहेत.शेतकर्यांवर अन्याय करणारे कायदे रद्द करण्यात आले हे काॅग्रेसचे यश आहे.
सोपानराव म्हस्के म्हणाले,शेतकरी दीड वर्षे आंदोलन करत आहेत पण पंतप्रधान त्यांना भेटायला गेले नाहीत.अखेर सरकारला कायदे मागें घ्यावे लागले. हे काॅंग्रेसचे यश आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तूची महागाई करून हे सरकार जनतेला वेठीस धरत आहे.
सरचिटणीस बाबुराव शिंदे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाची समस्या निरीक्षकांपुढे मांडली.किसनवीर सहकारी साखर कारखाना कायद्याच्या कचाट्यात सापडून बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. यासाठी कायदेशीर बाबी बाजुला सारुन शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी किसनवीर कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी जोरदार मागणी केली.
कार्यक्रमापूर्वी कुडाळ बाजारपेठेतून रॅली काढून पेट्रोल, डिझेल,गॅस महाग करणार्या व शेतकऱ्यांवर अन्याय करणार्या मोदी सरकारचा निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
