Thursday, February 19, 2026
HomeTop Newsधरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीच आंदोलनाचे हत्यार - वसंतराव मानकुमरे  :  शासन व...

धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीच आंदोलनाचे हत्यार – वसंतराव मानकुमरे  :  शासन व प्रशासनाने जागेवर येऊन आश्वासन दिल्या शिवाय माघार नाही. धरणग्रस्तांचा एल्गार



सूर्यकांत जोशी कुडाळ- जावली तालुक्यातील करहर व कुडाळ विभागातील 41 गावातील शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कुडाळी नदीवरील महू व हातगेघर या धरणांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. धरणग्रस्तांचे आजपर्यंत 95% प्रश्न मार्गी लावले असून उर्वरित पाच टक्के काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.हे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.  धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कोणताही राजकीय अधिवेश न बाळगता सर्व धरणग्रस्तांनी संघटित होऊन   आपले उर्वरित प्रश्न सोडवून घ्यावेत असे आवाहन ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले.जोपर्यंत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत शासन व प्रशासन जागेवर येऊन धरणग्रस्तांना त्यांचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असा इशारा वसंतराव मानकुमरे यांनी दिला आहे.
         महू व हातगेघर धरण ग्रस्त व लाभधारक कृती समितीच्या वतीने करहर येथील विठ्ठल मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मानकुमरे बोलत होते. यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे,भाजपा तालुकाध्यक्ष संदीप परामणे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे, दशरथ कांबळे, मच्छिंद्र मुळीक गुरुजी, अजय शिर्के, विकास धोंडे व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
          गेल्या 30 वर्षात धरणग्रस्तांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष केला. यामध्ये अनेकदा गुन्हे आपणावर गुन्हे दाखल झाले.अन्य धरणांच्या तुलनेत महू व हातगेघर धरणग्रस्तांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा शासन पातळीवर प्रयत्न केले . या धरणात कावडी आणि वहागाव ही दोन गावे पूर्णतः बाधित झाली.या गावांचे पुनर्वसन अजनूज व अहिरे येथे अतिशय सुंदर रित्या करण्यात आले आहे.त्याचबरोबर अंशतः बाधित असलेल्या गावांना तसेच शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून दिला आहे. कावडी गावातील शेतकऱ्यांना एकरी पंधरा लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळवून दिली.धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी आजपर्यंत सातत्याने शासन आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत आहे.आता काही उर्वरित पाच टक्के प्रश्न बाकी राहिले आहेत ते येत्या काही दिवसात मार्गी लागावे आणि या धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करत आहे.  यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. ‘जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय ‘ हे आंदोलन यशस्वी करून धरणग्रस्त व लाभधारक शेतकरी यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मानकुमरे यांनी स्पष्ट केले.
          हा प्रश्न राजकीय नसून हा सामाजिक जीवनाशी निगडित आहे आजपर्यंत जनतेने आपणास निवडून देऊन आपल्या कार्याची पोहच दिली आहे आणि या पुढील काळात सुद्धा ही सर्वसामान्य जनता आपल्या सोबतच राहील असा विश्वास आहे. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण करण्याची आपणास गरज नाही ज्यांना राजकारण करायचे त्यांनी खुशाल करावे त्याचा आपणास फरक पडणार नाही. धरणग्रस्तांच्या उर्वरित पाच टक्के प्रश्नांसाठी विरोध करणाऱ्यांनी केलेल्या 95 टक्के कामाचे श्रेय देण्याचा मोठेपणा दाखवावा.काही धरणग्रस्तांनी वेळच्यावेळी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. काही प्रश्न जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय पातळीवर सुटणारे आहेत तर काही प्रश्नांच्याबाबत शासन स्तरावर निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ही सर्व प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आंदोलनाची गरज ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कोणी याला राजकीय स्वरूप देऊन निवडणुकीचे राजकारण असल्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा मानकुमरे यांनी दिला.
         महू आणि हातगेघर या दोन्ही धरणांची कामे पूर्ण झाली असून कालव्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत.धरणाजवळ काही भाग कालव्यांना जोडण्याचा बाकी आहे पावसाळा संपल्यानंतर या कामाला प्रारंभ होईल. त्यामुळे येत्या काही दिवसात धरण ग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. जोपर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न पूर्ण मार्गे लागत नाहीत तोपर्यंत या धरणातील पाणी लाभक्षेत्राला मिळू शकणार नाही असेही मानकुमरे यांनी स्पष्ट केले.
धरणग्रस्तांच्या प्रश्नांनाच प्राधान्य सौरभ शिंदे
    महू व हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न अगोदर मार्गी लागावेत आणि नंतर लाभक्षेत्राला पाणी मिळावे. हाच उद्देश धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीचा आहे त्यामुळे या प्रश्नात कोणीही विसंगती आणू नये. अनेक विषय समोर आहेत धरण ग्रस्तांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचे काम ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून होत आहे. या धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गे लावण्याचे आदेश नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसात  अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. धरण ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावूनच पाणी लाभ क्षेत्रात येईल. प्रथम प्राधान्य धरण ग्रस्तांच्या अडचणी सोडवण्याला राहील. अशी ग्वाही प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी यावेळी दिली.
     भाजपा तालुकाध्यक्ष संदीप परामणे यांनी आभार मानले.



         

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page