
सूर्यकांत जोशी कुडाळ | प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करत सामाजिक बांधिलकी जपणारे सुरेश गायकवाड गुरुजी यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा मिळाल्यास ते अधिक उजळून निघेल. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गुरुजींचे व्यक्तिमत्त्व अधिक बहरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले.
जावली तालुक्यातील आशिया खंडातील सर्वात मोठ्या वटवृक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हसवे येथे गुरुजींच्या शैक्षणिक सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. शिक्षणासोबतच वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, ग्रामविकासासाठी एकजूट घडवणे आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे—या सर्व बाबींमुळे ग्रामस्थांनी कृतज्ञतेने हा सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ५२ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये स्वागत कमान (७ लाख), प्राथमिक शाळा रस्ता (२० लाख), अंगणवाडी इमारत (१२ लाख) आणि सोसायटी इमारत (१३ लाख) या कामांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला माजी आमदार सदाशिव सपकाळ, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, शिक्षक संघांचे नेते सिद्धेश्वर पुस्तके,भाजप मंडळाध्यक्ष संदीप परामणे, माजी सभापती अरुणा शिर्के, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड गुरुजींच्या कर्तृत्वाची दखल घेत ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी या कार्यक्रमात भाजप जावली तालुका प्रवक्तेपदी गुरुजींची नियुक्ती करत नियुक्तीपत्र प्रदान केले. तसेच शिक्षक संघातील त्यांच्या योगदानाचा गौरव करत सिद्धेश्वर पुस्तके यांनी राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती जाहीर केली.
माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी गुरुजींनी शिक्षकांच्या हक्कांसाठी परखडपणे भूमिका घेत सहकाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचे नमूद केले. “अधिकाऱ्यांकडून अडचणी निर्माण झाल्यास गुरुजींनी निर्भीडपणे प्रश्न मांडले—हे योगदान अमूल्य आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी म्हसवे वडाच्या वनराईला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी आणि आवश्यक सुविधा उभारण्यासाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. माजी सरपंच अजय शिर्के यांनी गावातील आजवरच्या विकास कामांचा आढावा घेत पुढील अपेक्षित कामांची मागणी मांडली.
सत्काराला उत्तर देताना सुरेश गायकवाड गुरुजी म्हणाले,शैक्षणिक सेवा बजावताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवले. कुटुंबासाठीचा वेळ आणि पैसा समाजासाठी खर्च केला. अशा वेळी माझ्या कार्याला पाठबल देण्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारी माझ्या धर्म पत्नीला आहे. “ग्रामस्थांनी केलेला हा सन्मान अविस्मरणीय आहे. उरलेले आयुष्य गावच्या प्रगतीसाठी समर्पित राहील. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे निष्ठेने काम करेन.” यावेळी त्यांनी म्हसवे गणातून अरुणा शिर्के यांना उमेदवारी देण्याची अपेक्षा टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली.गावाच्या विकासात अजय शिर्के यांना खंबीर साथ देणार आहे.
कार्यक्रमात मुंबईकर व म्हसवे ग्रामस्थांच्या वतीने मानचिन्ह देऊन गुरुजींचा नागरी सत्कार करण्यात आला. विठ्ठल विष्णू शिर्के, आनंदराव गायकवाड, सुभाष शिर्के, तुळशीदास शिर्के, अंकुश शिर्के, अनिल शिर्के, जयसिंग चव्हाण, योगेश सावंत, सोसायटी चेअरमन मानसिंग गोडसे, माजी सरपंच शैला शिर्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय वातावरण तापले
सेवा गौरव व विकास कामांच्या भूमिपूजनाचे औचित्य असले तरी सभास्थळी म्हसवे गणातून अरुणा शिर्के यांच्या उमेदवारीची मागणी ठळकपणे उमटताना दिसली—असेच एकंदर चित्र कार्यक्रमस्थळी होते.