निवडणुकित स्वतः चा बचाव करण्यासाठी विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न
कुडाळ – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कै.लालसिंगराव शिंदे तथा काका हे माझे आजोबा आहेत.त्यांच्या फोटोचा वापर निवडणूक प्रचारासाठी वापरून कोणी मतांचा जोगवा मागण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
ज्यांनी हयातभर काकांना विरोध केला ते आज त्यांच्या फोटो वापरुन प्रतापगड कारखान्याची निवडणूक लढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.काकांचे मोठेपण त्यांचे विरोधक मान्य करतात हा काकांच्या विचारांचा विजय आहे. स्वतः च्या घरातील स्वयंघोषित मोठ्या नेत्यांचा फोटो वापरुन मतदान मिळणार नाही याची जाणीव झाल्यानेच आज त्यांच्यावर आमच्या आजोबांचा फोटो वापरण्याची नामुष्की ओढवली आहे.मुळातच तालुक्याला अशा अपप्रवृत्ती पासून बचाव करण्याची आवश्यकता आहे.असेअसताना त्यांनाच कारखाना निवडणूकीत बचाव पॅनल करण्याचे सुचले आहे.
बचाव पॅनल करणारांनी अथवा त्या पितापुत्रांनी कोणतेही बीजारोपण केले तर येड्या बाभळीच उगवतात.परंतू आम्ही बीजारोपण केलेली झाडे थंडगार सावली आणि फळे देतात.म्हणूनच त्यांची आम्ही लावलेल्या झाडावर आहे.यादोन्ही मधील फरक कारखाना सभासद व तालुक्यातील जनतेला चांगलाच ज्ञात आहे.प्रतापगड सहकारी साखर कारखाना चालवायला संस्थापक सहकार पॅनल सक्षम आहे.त्याला कोणत्याही बचावाची गरज नाही.आणि जे कारखान्याचे सभासद नाहीत ते काय आणि कसा बचाव करणारे असा टोला सौरभ शिंदे यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.
जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ.शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी प्रतापगड कारखाना चालवून शेतकरी सभासदांना व कामगारांना नक्कीच न्याय मिळेल.असा विश्वास सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.यापुढे काकांच्या नावाचा वापर करुन कोणी सभासद व कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करुन सडेतोड उत्तर दिले जाईल असे ही या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.