*जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरातील घटना*
सूर्यकांत जोशी कुडाळ – 9421214450
जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला( ग्राम महसूल अधिकारी) गुरुवारी सकाळी सापदंश झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने महसूल विभागासह शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला गुरुवारी सकाळी सापदंश झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने महसूल विभागासह शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.
जखमी तलाठ्याचे नाव आकाश रामभाऊ काशिकेदार (वय ३०) असे असून ते पंचनामे करताना गवताळ भागातून जात होते. दरम्यान, गवतात लपलेल्या सापावर त्यांचा पाय पडताच सापाने दंश केला. काही अंतर चालल्यानंतर त्यांना भोवळ येऊ लागली. शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना उचलून जामखेड येथील शिलादीप हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची दखल विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तत्काळ घेतली. त्यांनी रुग्णालयात भेट देऊन तलाठ्याची प्रकृती जाणून घेतली. तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
धनेगाव परिसरात अलीकडील पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेतात उतरत असतानाच या प्रकारची घटना घडल्याने शेतकरी व अधिकारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीनंतर सरपटणाऱ्या प्राण्यांची हालचाल वाढल्याने अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी सांगितले.