लेखक : सूर्यकांत जोशी कुडाळ. 9421214450
जीवनाची धावपळ आणि पन्नाशीचा टप्पा
माणसाचं जीवन म्हणजे एक अखंड प्रवास. बालपणापासून सुरू झालेला हा प्रवास — शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, मुलांचं संगोपन, त्यांच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी — या सगळ्या टप्प्यांतून झपाट्याने पुढे जात राहतो. आयुष्याची पहिली पन्नास वर्षं माणूस इतरांसाठी जगतो, स्वतःसाठी नव्हे. आणि मग, जेव्हा या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतात, मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात, संसार स्थिरावतो — तेव्हा मनात एक गोड विचार उमटतो : “आता थोडं निवांत जगावं, स्वतःसाठी काही करावं.” मित्र आप्तेष्टही म्हणतात अरे वा आता तुम्ही निवांत झालात.निवांतपणाचा शोध, पण मनातली अस्वस्थता
निवांतपणाचा शोध, पण मनातली अस्वस्थता
पण जेव्हा हे “निवांतपण” खऱ्या अर्थानं मिळतं, तेव्हा मन शांत न राहता उलट अधिक अस्वस्थ होतं.
पन्नाशी ओलांडल्यावर शरीरही थकायला लागतं — अंगदुखी, गुडघेदुखी, ब्लड प्रेशर, शुगर अशा गोष्टी सोबत येतात. डॉक्टर सांगतात, “रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण प्रेशर का वाढतंय?”उत्तर मात्र शरीरात नसून मनात असतं.कारण आता जबाबदाऱ्या संपल्या असल्या तरी मनाला थांबायचं जमत नाही. आयुष्यभर जे धावत आलं, ते अचानक थांबलं की रिकामेपणा, बेचैनी, आणि कधी न जाणवलेली एकाकीपणाची जाणीव डोकावते. आपण हयात वर केलेल्या कष्टाचे फलित काय असाही विचार नक्कीच मनात होतो.
सुखाचा संसार आणि बदलते समीकरण
सर्व पालकांचं स्वप्न असतं — मुलांचं लग्न झाल्यानंतर आपल्या सुनाबाईं, नातवंडांसोबत वेळ घालवायचा, त्यांच्या खेळण्यात रमायचं, निवांत आयुष्याचा आनंद घ्यायचा.पण आजच्या बदलत्या जीवनशैलीने या स्वप्नांनाही नवा रंग दिला आहे.नव्या पिढीचं शिक्षण, विचारसरणी, आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा वेगळा स्वार्थी आहे.त्यांना ‘स्वातंत्र्य’, ‘प्रायव्हसी’ आणि ‘स्वतःचा स्पेस’ या संकल्पना महत्त्वाच्या वाटतात.तर जुन्या पिढीला अजूनही ‘एकत्र राहणं’, ‘कौटुंबिक बंधन’ आणि ‘परंपरा’ हेच जीवनाचं सार वाटतं.या दोन विचारसरणींमधील संघर्षामुळे नकळत एक वैचारिक दरी निर्माण होते. अशावेळी कर्तव्य परायण मुलांची मात्र चांगलीच फरफट होते बायको की आई-वडिल असा यक्षप्रश्न त्यांच्या पुढ्यात असतो. हल्लीच्या जमान्यात मुलीप्रमाणे प्रेम करणाऱ्या ज्यांना सुना मिळतात ते सासू सासरे खूपच भाग्यवान ठरतात.
मोठी घरं, लहान मनं
पूर्वीच्या काळात एका झोपडीत, एका अंगणात तीन-चार पिढ्या एकत्र राहत.तेथे जागा कमी होती, पण मनं मोठी होती.दुःख वाटून घेतलं जायचं, सण एकत्र साजरे व्हायचे, घरातला प्रत्येक सदस्य एकमेकांच्या आयुष्याशी जोडलेला असायचा.
आज परिस्थिती उलट आहे.
घरं मोठी झाली, सुखसुविधा वाढल्या, पण माणसांमधलं अंतरही वाढलं.सासू-सासरे, दीर-जावा, आत्या-काका हे नातेसंबंध आता “अडथळा” वाटू लागलेत.“स्वतःपुरतं कुटुंब” ही संकल्पना आता “एकत्र कुटुंबा”ची जागा घेत आहे. उच्चशिक्षित मुलींना आणि विशेषता नोकरी करणाऱ्या मुलींना आपले शिक्षण आणि पगार या पलीकडचे भावनिक ऋणानुबंध याचे संस्कार झालेलेच नसतात किंवा त्यांना त्या बंधनात गुंतून पडायचे नसते आणि या हव्यासातच किंवा अशा अहंकारात अनेकांचे संसार कोलमडून पडतात. त्यांना सासू-सासर्याने उच्चशिक्षित केलेला मुलगा हवा असतो त्याचा गच्चम पगार हवा असतो सासू सासर्यांनी कष्टातून निर्माण केलेली प्रॉपर्टी हवी असते. पण त्यांचा सहवास मात्र नको असतो. अशा स्वार्थी विचारामुळेच आज कौटुंबिक न्यायालयात अशा उच्चशिक्षितांची घटस्फोटासाठी रांग लागलेली दिसते.
एकाकीपणाचं सावट आणि मनाचे आजार
या बदलाचा सर्वाधिक परिणाम पन्नाशीनंतरच्या आई-वडिलांवर होतो.त्यांच्या मनात एक न बोललेली सल निर्माण होते —
“आपण मुलांसाठी सर्व काही केलं, त्यांच्या सुखासाठी आयुष्य झिजवलं,पण आज त्यांच्या संसारात आपल्या अस्तित्वाचं स्थान कुठे आहे?”
ही सल, ही हळहळ, ही भावनिक वेदना — शरीरातल्या आजारांपेक्षा अधिक त्रासदायक ठरते.ब्लड प्रेशर, शुगर, निद्रानाश, अस्वस्थता — या अनेक व्याधींचं मूळ हेच मनाचं एकाकीपण असतं.डॉक्टर औषध देतात, पण मनावरची ही पोकळी कोण भरेल?
उपाय आहे — संवाद, समजुती आणि सहानुभूती
या नात्यातला ताण कमी करण्याचा उपाय औषधात नाही, तर “समजुतीत” आहे.मोठ्यांनी नव्या विचारांना स्वीकारायला हवं, आणि नव्या पिढीने मोठ्यांच्या अनुभवाला मान द्यायला हवा.प्रेम, संवाद आणि परस्पर आदर यांमधूनच कौटुंबिक संस्कृती टिकते.
सुनांनी सासू-सासऱ्यांना “ओझं” न मानता “आशीर्वाद” समजावं,तर सासू-सासऱ्यांनीही नव्या पिढीच्या स्वातंत्र्याला बांध न घालता त्यांना समजून घेणं गरजेचं आहे.थोडा संवाद, थोडी सहानुभूती, आणि थोडा दिलासा — एवढंच पुरेसं आहे या वैचारिक दरीला भरून काढण्यासाठी.
आयुष्य अजून संपलेलं नाही…
पन्नाशी नंतरचं जीवन म्हणजे शेवट नव्हे, तर नव्या जीवनाची सुरुवात.हा काळ स्वतःला पुन्हा शोधण्याचा, अपुरं राहिलेलं पूर्ण करण्याचा, आणि मनाने तरुण होण्याचा असतो.जुन्या आठवणींत रमून न जाता, नवीन छंद जोपासा, मित्रांना भेटा, मनातल्या भावना लिहा.
हसा, गा, फिरा — कारण मनाचं आरोग्य हेच खरं आयुष्याचं सुख आहे.जीवनाच्या उत्तरार्धात शरीर थकू शकतं, पण मन वृद्ध होऊ देऊ नका.आयुष्यभर जे इतरांसाठी केलं, आता थोडं स्वतःसाठी जगा.
कारण —
आयुष्याचं सौंदर्य शेवटच्या टप्प्यातच उमलतं,
फक्त त्याकडे प्रेमानं बघण्याची नजर हवी.