Thursday, February 19, 2026
HomeTop Newsपन्नास वर्षांच्या अविरत सेवेला द्या अखेरचा निरोप : निरंजना (कुडाळी )नदीवरील पुलाची...

पन्नास वर्षांच्या अविरत सेवेला द्या अखेरचा निरोप : निरंजना (कुडाळी )नदीवरील पुलाची भावपूर्ण हाक

अवघ्या काही दिवसांचा सोबती राहिलेला कुडाळी नदीवरील पूल (सूर्यकांत जोशी कुडाळ )


सूर्यकांत जोशी कुडाळ – नमस्कार मंडळी मी… निरंजना (कुडाळी) नदीवर  कुडाळ येथे उभा असलेला तो जुना पूल. मी आता आपला लवकरच निरोप घेणार आहे.
आज माझ्या अस्तित्वाच्या शेवटच्या टप्प्यावर उभा राहून, गेल्या पन्नास वर्षांचा प्रवास आठवतोय… थोडा अभिमान, थोडी हुरहूर आणि मन भरून येईल अशी असंख्य आठवणी घेऊन.

१९७५ च्या सुमारास माझा जन्म झाला. त्या दिवशी कुडाळ विभागाचा मेढा या तालुक्याच्या ठिकाणाशी कायमस्वरूपी संबंध जुळला. माझ्या आधी पावसाळा आला की नदीपलीकडील लोकांचे कुडाळ विभागाशी नाते तुटायचे. नदीचे पाणी वाढले की कुडाळ, सोनगाव, आर्डे, बेलावडे,करंदोशी, नेवेकरवाडी, आलेवाडी, दरे इत्यादी गावे वेगळी पडायची.
मी आलो… आणि या साऱ्यांना जोडून टाकले.

माझ्या अंगावरून शेतकऱ्यांच्या बैलगाड्या गेल्या.
त्यांच्या बैलांच्या डोळ्यातील थकवा मी पाहिलाय.
चढ चढताना त्यांचा श्वास फुलायचा, गाडी अडकायची, पण तरीही त्यांनी हार मानली नाही.ऊस भरलेले ट्रॅक्टर, ट्रक, एसटी बस, दुचाक्या, पायी चालणारे आबालवृद्ध — सगळ्यांना मी खंबीरपणे सांभाळलं. हो… माझ्या दोन्ही टोकांना मोठा चढ आहे, हे मला मान्य आहे.त्या चढावर अनेकदा वाहने अडखळली, लोक चिडले, त्रास झाला.पण एवढ्या पन्नास वर्षांत माझ्या अंगावरून एकही जीवघेणा अपघात घडला नाही, याचा मला अभिमान आहे.मी कधी कुणाचा जीव घेतला नाही — उलट अनेकांचे जीवन सुलभ केलं.

पावसाळ्यात…
निरंजना रौद्ररूप धारण करते.माझ्या अंगावरून पाणी वाहू लागतं, जणू काही निरंजन मला न्हाऊ घालते तेव्हा लोक म्हणतात — “महापूर आला!” योगायोग म्हणजे त्याच वेळी पिंपळेश्वर-वाकडेश्वर मंदिरातील मूर्तींच्या तोंडाला पाणी लागतं.पूर आल्यानंतर अनेक तरुणांचा उत्साह उसळतो…
ते माझ्यावरून पुराच्या पाण्यात उडी मारतात, पाण्याच्या प्रवाहासोबत पोहत पोहत मंदिरापर्यंत पोहोचतात.
मी त्यांना थांबवत नाही — फक्त मनोमन त्यांना सुरक्षित राहण्याची प्रार्थना करतो.

मी दगडांचा, सिमेंटचा, लोखंडाचा असेन…
पण माझ्यातही भावना आहेत.
मी पन्नास वर्षे कुडाळ विभागाची प्रामाणिक सेवा केली आहे.
रोज हजारो पावलांचा, चाकांचा भार सहन केला…
कधी तक्रार केली नाही.

आता काळ बदलतोय.
पाचवड ते खेड दरम्यान केंद्र शासनाच्या हॅम योजनेतून नवा महामार्ग उभा राहत आहे.
माझ्या जागी आता एक नवा, रुंद, उंच पूल उभा राहणार आहे.
तो अधिक सुरक्षित असेल, चढ कमी असतील, वाहतूक सुसह्य होईल — हे ऐकून मला आनंदच आहे.
कारण विकास थांबू नये, एवढीच माझी इच्छा आहे.

आज मी जाणार आहे…
पण माझ्या आठवणी या नदीत, या रस्त्यांवर, या गावांच्या श्वासात कायम राहतील.
कुडाळकरांनो,
मी तुमचा होतो… तुमचाच राहीन.
माझ्या सेवेला आठवणींचा निरोप द्या, एवढंच मागणं आहे.


पन्नास वर्षांचा सेवक :
निरंजना कुडाळी नदीवरील जुना पूल

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page