सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आठ कर्मचारी सध्या उपचारार्थ क्वारंटाईन आहेत.त्यामुळे उर्वरित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करत असताना दिसून येत आहे.असे असताना या यंत्रणेला छोट्या मोठ्या कारणांनी वेठीस धरण्याचा तसेच लसीकरणाच्या कारणांवरून वादविवाद होत असल्याचे निंदनीय प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अपूर्या कर्मचारी वर्गावर वैद्यकीय सुविधा देताना वैद्यकीय अधिकार्यांना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे.या आरोग्य केंद्रांतर्गत रूईघर ,शिंदेवाडी पासून सरताळे पर्यंतची साठ ते पासष्ट गावे येत आहेत.जवळपास सत्तर हजार लोकसंख्येला डॉ.अनंत वेलणकर . डॉ.स्वामिनी चव्हाणके हे दोन वैद्यकीय अधिकारी व अन्य सोळा कर्मचारी आरोग्य सुविधा पुरवत आहेत.पैकी निम्मा कर्मचारी वर्ग सध्या उपचारार्थ आहे.
सध्याचा कोरोना महामारी काळ हा सर्वांसाठीच एक आव्हान आहे.अशा परिस्थितीत सर्वांनीच संयम दाखवणे व सहकार्य करणे आवश्यक आहे.लसीकरणाबाबत शासनाचे धोरण अधांतरी दरबारा प्रमाणे आहे.लस किती येणार,कोणती येणार, कधी येणार या प्रश्नाचे उत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा तालुका प्रशासनाकडे ही सकाळी दहा वाजेपर्यंत नसते.लोक मात्र लस घेण्यासाठी सकाळी सहा पासून गर्दी करत आहेत.
खरंतर आरोग्य विभाग, प्रशासनात काम करणारे अधिकारी व कर्मचारी तुमच्या आमच्यातीलच आहेत.त्यांनाही व्यक्तीगत व कौटुंबिक जीवन आहे हे कोणी विसरता कामा नये. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी आरोग्य विभाग चोवीस तास सज्ज आहे.परंतु लसीकरणाची नोंदणी सकाळी नऊ नंतर सुरू होत असताना पहाटे पासून लसीची चौकशी करण्यासाठी काही लोक येत असल्याचे प्रकार याठिकाणी घडत आहेत.लस पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.त्यामुळे त्याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला लस देणे शक्य नाही.असे असताना काही लोक आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालतात.बर्याचदा गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना बोलवावे लागत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वामिनी चव्हाणके यांनी सांगितले.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस घेणारे आणि कोविड टेस्ट करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी होत आहे.या बरोबरच सामान्य रुग्ण येत आहेत.त्यामुळे याठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.ही आरोग्य केंद्रे कोरोना संसर्ग केंद्र बनतील की काय अशी भिती ही गर्दी पाहिल्या नंतर वाटतें.वास्तविक कोरोना हद्दपार करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे.त्यामुळे लस सर्वांपर्यंत सुलभतेने पोहचण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे.एकीकडे गर्दी होऊनये म्हणून लाॅकडाऊनचा फतवा काढायचा आणि दुसरीकडे लसीकरणासाठी लोकांना आरोग्य केंद्रांतवर घिरट्या मारायला लावायच्या हे दुष्टचक्र थांबले पाहिजे.लसीकरण गाव निहाय व्हावे.मतदान बूथ प्रमाणे लसीकरणाचे बूथ व्हावेत.मोठ्यागावांत प्रभाग निहाय लसीकरण करण्यासाठी नियोजन व्हावे.लसीसाठी लोकांनी दाही दिशा फिरण्यापेक्षा लस लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.