Thursday, February 19, 2026
HomeTop Newsप्रतापगड कारखाना तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीचा केंद्रबिंदू व्हावा –  सौरभ शिंदे. प्रतापगड कारखान्याची...

प्रतापगड कारखाना तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीचा केंद्रबिंदू व्हावा –  सौरभ शिंदे. प्रतापगड कारखान्याची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


सूर्यकांत जोशी कुडाळ –
              स्व. लालसिंगराव शिंदे काका यांच्या स्वप्नातून साकार झालेला आणि स्व. चेअरमन राजेंद्र शिंदे भैय्यांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीचा केंद्रबिंदू व्हावा, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी व्यक्त केली.

              प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि. सोनगाव करंदोशीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सौरभ शिंदे होते. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप परामणे, माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती रविंद्र परामणे, कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, धनंजय केंजळे, अजय शिर्के,समाधान पोफळे,श्रीहरी गोळे संचालक, सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   ना. शिवेंद्रसिंह राजेंचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे यशस्वी वाटचाल

सौरभ शिंदे म्हणाले, ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली “अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून गेले दोन हंगाम यशस्वी पार पडले. यावर्षी ऊस उपलब्धता चांगली असल्याने शेतकरी व सभासदांनी ऊस पुरवठा करून सहकार्य करावे. खाजगी कारखान्यांच्या दरस्पर्धेत सहकार टिकू शकत नसला तरी प्रतापगड कारखाना शेजारील कारखान्यांच्या तुलनेत सभासदांच्या हिताचे दर नक्कीच देईल.”



प्रतापगड आपला – कामगारांचे योगदान मोलाचे

“प्रतापगड कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे. त्याच्या सुयोग्य कारभारासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. कामगारांचे योगदान कारखान्याच्या प्रगतीत अतिशय मोलाचे असून, संचालक मंडळ त्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेत आहे. भविष्यात कारखान्यात सहयोगी उद्योग उभारून उसाला अपेक्षित दर देण्याचा प्रयत्न राहील,” असे शिंदे म्हणाले.

स्व. काकांच्या जिद्दीचे स्मरण

प्रतापगड कारखान्याच्या उभारणीमागील प्रेरणादायी कथा सांगताना शिंदे म्हणाले, “किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवानंतर काकांना प्रतापगड उभारणीची जिद्द निर्माण झाली. अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केल्यास यश मिळते हे संस्कार काकांकडून शिकता आले.”

मदतीसाठी पुढाकार

अलीकडील अतिवृष्टीमुळे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी दुरवस्थेत सापडले आहेत. त्यांना मदत म्हणून प्रतापगड कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.



चेहऱ्यावरील अविस्मरणीय भाव – ऍड. मर्ढेकर

या वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर म्हणाले, “चाचणी गळीत हंगामात तयार झालेली पहिली साखरेची मूठ काकांनी स्वतःच्या हाताने संचालक मंडळाच्या तोंडात भरवली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव आजही अविस्मरणीय आहेत.”

यशाच्या भागीदारांचा सन्मान
               सभेत जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा, तोडणी-वाहतूक ठेकेदारांचा, आदर्श कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्व. लालसिंगराव शिंदे व स्व. राजेंद्र शिंदे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

             संचालक नानासाहेब पवार यांनी स्वागत केले. बाळासाहेब निकम यांनी नोटीस वाचन, कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांनी अहवाल वाचन, तर विकास यादव यांनी नफा-तोटा पत्रक वाचन केले. संचालक प्रदीप तरडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page