Thursday, February 19, 2026
HomeTop Newsप्रतापगड कारखाना निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; दोन्ही पॅनल कडुन विजयाचे दावे...

प्रतापगड कारखाना निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; दोन्ही पॅनल कडुन विजयाचे दावे : रविवारी मतदान

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील एक मेव कृषि औद्योगिक प्रकल्प असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक सहकार पॅनलला जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखाना बचाव पॅनल ने आव्हान दिले आहे.दोन्ही पॅनलच्या कुडाळ येथे सांगता सभा झाल्या.या मध्ये दोन्ही पॅनल कडुन विजयाचे दावे करण्यात आले आहेत.रविवार दि.१३ रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

             कारखान्याची एकूण सभासद संख्या  सहा हजार आहे.पैकी एक हजार दोनशे सभासद मयत असून अनेकांच्या वारस नोंदी झालेल्या नाहीत.जावली व महाबळेश्वर तालुका हे कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे.संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी मतदान होणार असून पैकी तीन जागी संस्थापक सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवड झाली आहे.उर्वरीत १८ जागांसाठी बचाव पॅनलचे १६  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

        रविवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कुडाळ,सरताळे,करंदी तर्फे कुडाळ,हुमगांव, खर्शी बारामुरे, आनेवाडी,सायगांव, सोनगाव, मेढा, केळकर, महाबळेश्वर व पाचगणी अशा बारा गावांतील मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

              संस्थापक सहकार पॅनलला कै.माजी आमदार लालसिंगराव शिंदे  व कै.राजेंद्र शिंदे यांचा वारसा आहे.काका व भैय्या या पितापुत्रांचे कारखाना उभारणी नंतर अल्पावधीतच निधन झाले. परंतू त्यांचे योगदान आणि सभासदांची अढळ श्रद्धा व विश्वास ही या पॅनलची  ताकद आहे.कारखान्याच्या चेअरपर्सन श्रीमती सुनेत्रा शिंदे व सौरभ शिंदे यांनी प्रतापगड कारखान्याची सुत्रे सांभाळली, अवर्षण,लोकरी मावा या सारखी नैसर्गिक संकटे, तालुक्यात अपुरे ऊसाचे क्षेत्र आणि आर्थिक संकट अशा विविध अडचणींचा सामना या कारखान्याला सुरुवातीपासूनच करावा लागत आहे.यातून मार्ग काढुनी कारखाना सुरू राहण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना पाच वर्षांसाठी सोमय्या ग्रुप,तीन वर्षांसाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांना भाडे तत्वावर देण्यात आला.

         दरम्यानच्या काळात कारखान्यावर लिलावाचे संकट आले.ही वेळ किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सावरली गेली.तब्बल सोळा वर्षांसाठी किसनवीर सहकारी साखर कारखान्याने प्रतापगड कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला.यांनी पाच वर्षे कारखाना सुरळीत चालवला त्यानंतर किसनवीर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला. प्रतापगड कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद राहिला.करारा प्रमाणे प्रतापगड कारखाना चालवणे ही किसनवीर कारखान्याचीच जबाबदारी आहे.त्यामुळे कारखाना बंद राहिला त्यास संचालक मंडळ जबाबदार नाही तसेच किसनवीर कारखान्यांकडून कारखाना सोडवुन घेऊन पुढील गळीत हंगाम स्वबळावर चालविण्याचा दावा   संस्थापक सहकार पॅनलच्या माध्यमातून प्रचारा दरम्यान केला आहे.

         प्रतापगड सहकारी साखर कारखाना निर्मितीसाठी कै.लालसिंगराव शिंदे व कै. राजेंद्र शिंदे यांचे योगदान मान्यच परंतू त्यांच्या पश्चात वारसांमध्ये कुवत नसल्यानेच कारखान्यावर भाडे वहिवाट कायम आहे.किसनवीरआणि प्रतापगड हे दोन्ही कारखाने बंद असल्याने जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक तसेच राजकीय अडचणी वाढल्या. कारखान्याच्या कामगारांना वेतन नाही.त्यामुळे कामगार देशोधडीला लागले . ही परिस्थिती बदलण्यासाठी हा कारखाना सुरळीत चालावा व भविष्यात लिलावा पासुन वाचावा यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचा दावा कारखाना बचाव पॅनल च्या वतीने करण्यात आला आहे.

           संस्थापक सहकार पॅनलला आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे , माजी आमदार सदाशिव सपकाळ,जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांच्या सह  तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी पाठींबा दिला आहे.तर बचाव पक्षाला जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार व सुधीर पवार या बंधुची मोजक्या सभासदांसोबत एकाकी लढत दिसून येत आहे.तर या पॅनलला छुपे पाठबळ असल्याचीही चर्चा होत आहे.

           प्रतापगड कारखाना निवडणुकीसाठी गेले आठ दिवस प्रचाराची दोन्ही पॅनल कडुन रणधुमाळी सुरू होती.तालुक्यातील राजकारण अक्षरशः ढवळुन निघाले.रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मेढा येथे मतमोजणी होणार आहे.या निकालानंतर सत्ताधारी पॅनलवर सभासदांचा विश्वास की नाराजी हे स्पष्ट होणार आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page