????
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन – “जावलीचा ऊस प्रतापगडलाच द्या”
सूर्यकांत जोशी कुडाळ, – स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र भैय्या यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना आजही जावली तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना म्हणून ओळखला जातो. या दोन्ही थोर नेत्यांचे नेतृत्व आज आपल्या सोबत नसले तरी त्यांची कार्यशैली आणि कारखान्याची परंपरा आजही कायम आहे.
सोनगाव (ता. जावली) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना (अजिंक्यतारा–प्रतापगड साखर उद्योग समूह) याच्या सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून मोठ्या उत्साहात करण्यात आला. या प्रसंगी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले, “हा कारखाना सभासद शेतकऱ्यांचा असून आम्ही फक्त केअरटेकर म्हणून काम करत आहोत. जावलीतील ऊस बाहेर न नेता प्रतापगडलाच द्यावा, हा कारखाना आपल्या सर्वांचा आहे. कोणत्याही परिस्थितीत जावलीतील ऊस बाहेर जाता कामा नये. कारखान्याच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी आपण काटकसरीने कारखाना चालवत आहोत. आज परिस्थिती जरी थोडी कठीण असली तरी भविष्यात प्रतापगड नक्कीच स्पर्धेत सर्वांच्या पुढे राहील, याचा मला ठाम विश्वास आहे.”
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, “ऊस दराबाबत कोणीही चिंता करू नये. कारखान्याचे कामकाज राजकारणमुक्त आहे. गट-तट न पाहता सर्वांचा ऊस घेतला जाणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी सहकार्य कायम ठेवावे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, याच हेतूने आम्ही हा कारखाना सुरू केला आहे.”
या हंगामासाठी सुमारे ७७०० हेक्टर ऊस नोंदवला गेला असून २३७ पेक्षा जास्त तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. संचालक मंडळाने या हंगामाच्या यशस्वीतेसाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापगडचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे होते. ते म्हणाले, “तालुक्याचा हक्काचा कारखाना दोन हंगामांपासून सुरू आहे. आता तो सक्षमपणे चालवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कारखान्याला ऊस द्यावा. अजिंक्यतारा कारखान्याचे मोलाचे योगदान या नव्या सुरुवातीमध्ये आहे. कारखान्यामुळे शेतकरी, कामगार आणि सभासद यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल.”
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, तसेच दोन्ही कारखान्यांचे संचालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा शुभारंभ मोळी टाकून करण्यात आला. यानंतर मान्यवरांचा सत्कार दोन्ही कारखान्यांच्या वतीने करण्यात आला. तसेच संचालिका सौ. शोभाताई बारटक्के यांचा वाढदिवसही मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर यांनी केले, तर नामदेव साळुंखे यांनी आभार मानले.
????
प्रतापगड पुन्हा भरारी घेऊन, शेतकरी व कामगारांचे भविष्य उज्ज्वल करेल – नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले :अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योग समूहाचा गाळप हंगाम उत्साहात सुरू
- Advertisment -