Sunday, April 5, 2026
HomeTop Newsप्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा दिमाखात

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा दिमाखात


आगामी गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्याचे आवाहन – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सूर्यकांत जोशी, कुडाळ :
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा पारंपरिक बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. या वेळी उपस्थित राहून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या व शेतकऱ्यांना ऊस पुरवठ्याचे आवाहन केले.

या वेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, “यावर्षी परिसरात ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून ऊसाला स्पर्धात्मक दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस या कारखान्याला द्यावा व कारखान्याच्या यशस्वी गळीत हंगामासाठी सहकार्य करावे.”

समारंभाचे प्रास्ताविक करताना प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी सांगितले की, “ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूह सक्षमपणे काम करत आहे. येणाऱ्या काळात प्रतापगड सहकारी साखर कारखाना अधिक बळकटपणे उभा राहील आणि स्थानिक शेतकरी व कामगार यांना स्थैर्य देईल.”

ते पुढे म्हणाले की, “कारखान्याचे चाक सतत सुरू राहिले, तर केवळ शेतकरी सभासदांनाच नव्हे तर परिसरातील सर्वच व्यवसाय, उद्योगधंदे, कामगार व लघुउद्योगांना चालना मिळते. त्यामुळे ऊस पुरवठा अखंडित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

या सोहळ्यास अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन व्हाईस चेअरमन कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, सभासद शेतकरी, कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधी, पूजा-अर्चा करून बॉयलरला अग्नी प्रदिपन करण्यात आले व यशस्वी गळीत हंगामासाठी मंगलमय सुरुवात झाली.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page