कुडाळ – थंड हवामान आणि नैसर्गिक सौंदर्य लाभल्याने महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी महाबळेश्वरची ओळख आहे.महाबळेश्वरच्या थंड वातावरणात काश्मीर प्रमाणेच सफरचंद, आक्रोड या सारख्या दर्जेदार फळांच्या उत्पादनाचे स्वप्न महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक दिपक बोराडे यांनी पाहिले आहे.त्यांच्या या संशोधक संकल्पनेला महाबळेश्वर मधील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला . यातूनच महाबळेश्वर तालुक्यात प्रथमच अना व डोरसेट गोल्डन या वानांची लागवड नावीन्य पूर्ण बाब म्हणून प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे.अशी माहिती कृषी पर्यवेक्षक बोराडे यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व जावली तालुक्यातील अग्रगण्य प्रगतशील शेतकरी सयाजीराव शिंदे यांच्या आखाडे ता.जावली येथील निवासस्थानी महाबळेश्वर चे कृषी पर्यवेक्षक दिपक बोराडे यांनी भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी दैनिक ऐक्य प्रतिनिधिंशी ते बोलत होते.
शासकीय नोकरीत नेहमी कायद्याच्या चाकोरीत जे नियमानुसार असेल तेवढीच पाटी टाकण्याचे काम केले जाते.त्यातलाही सावळा गोंधळ नेहमीच सर्वसामान्य जनता अनुभवत असते.परंतू यालाही अनेक कर्तव्य दक्ष अधिकारी अपवाद असतातच.प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या ज्ञानाला प्रयत्नांची जोड देऊन आपले कर्तृत्व सिद्ध करणारे अधिकारी मिळणे त्या विभागासाठी हे सुद्धा तितकेच भाग्याचे ठरते.
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही असाच प्रत्यय येत आहे.कृषीपर्यवेक्षक दिपक बोराडे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी चंद्रकांत मोरे, हातलोत ( बुरढाणी ) श्री.राजन ढेबे, मोळेश्वर यांना आपली संकल्पना पटवून दिली.त्यानुसार श्रीनगर येथील नर्सरीमध्ये संपर्क साधून सफरचंद आणि अक्रोडची प्रत्येकी शंभर रोपे मागवली आहेत.यापूर्वी काळा,लाल,हिरवा अशा विविध प्रजातींच्या तांदूळ व गहू उत्पादनाचा प्रयोग बोराडे यांनी केला आहे.
सफरचंद आणि आक्रोडची लागवड शेताच्या बांधावर करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही.सफरचंदाची फळ धारणा काश्मीर च्या वातावरणात तीन वर्षांत होते. तर आक्रोड ची फळ धारणा सहा वर्षांत होते. सध्या महाबळेश्वरच्या थंड वातावरणात स्ट्रॉबेरी चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.परंतू अलिकडच्या नियमित बदलत्या वातावरणाचा फटका अनेकदा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.अशा संशोधनात्मक प्रयोगातून येथील शेती उत्पादनाला वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे.
या संशोधना साठी शासन पातळीवरून योजना येण्याची वाट पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा नाविन्यपूर्ण शेतीची आवड असणारे शेतकरी स्वतः होऊन पुढे येत आहेत. प्रसंगी पदरमोड करुन बोराडे शेतीमधील संशोधन करत आहेत.दिपक बोराडे यांच्या सारख्या एका जबाबदार अधिकार्यांची येथील शेतकरी समृद्ध होण्यासाठी ची तळमळ आणि प्रयत्न कौतुकास्पद आहेत.प्रबळ इच्छा शक्ती आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे हा प्रयोग यशस्वी होण्याबाबत तीळमात्र ही शंका नाही.त्यामुळे लवकरच महाबळेश्वरची एक नवीन ओळख निर्माण होईल असा विश्वास सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केला.