सूर्यकांत जोशी कुडाळ – माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या घराण्याशी अखेरच्या क्षणा पर्यंतचा निष्ठावंत शिलेदार अशी ओळख असणाऱ्या कुडाळ गावचे सुपुत्र शामराव भिकाजी किर्वे तथा अण्णा यांचे रविवारी दुःख द निधन झाले.कै .शामराव अण्णांच्या खडतर जीवनाचा घेतलेला आढावा …
कै.शामराव भिकाजी किर्वे तथा अण्णांचा जन्म १/१०/१९४२ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. कुटुंबात थोरले असल्याने पूर्ण कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर होती.शेती आणि दुधाचा व्यवसाय सांभाळून त्यांनी कुटुंबाला आधार दिला.
जावली तालुक्यातील परिसस्पर्शी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या स्पर्शाने अण्णांच्या जीवनाचे सुद्धा सोने झाले असेच म्हणावे लागेल.अर्थात आजच्या जमान्यात सोनं व्हावं या शब्दाचा अर्थ पैसा आणि श्रीमंती असा होई.पण साधारणतः १९६५-७० काळाचा विचार करता त्याकाळात तत्व,निष्ठा आणि प्रामाणिक पणा हा लाखमोलाचा होता.काकांच्या राजकारणात पैशाला कधीच स्थान नव्हते.काकांनी त्यांच्या कारकिर्दीत गोरगरिब आणि गरजुंना मदतीचा हात दिला. त्याप्रमाणेच कै काकांच्या सान्निध्यात राहुन अण्णांनी त्यांच्या कडून लाखमोलाचा चांगुलपणा व विश्वास मिळवला .
माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या सामाजिक, सहकार व राजकीय खडतर प्रवासात आण्णांनी मोलाची साथ दिली.जावली तालुका खरेदी विक्री संघाचे पुनरुज्जीवन,लालसिंगराव शिंदे सरकारी पतसंस्था, प्रतापगड सहकारी साखर कारखाना या सहकारी संस्था उभारणीत सुद्धा अण्णांचा सिंहांचा वाटा आहे.प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत अहोरात्र मेहनत घेतली.
कै.लालसिंगराव शिंदे व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या निधनानंतर या कुटुंबाला अण्णांनी भक्कम आधार दिला.कारखान्याच्या विद्यमान चेअरमन सुनेत्रा शिंदे व पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या पाठीशी सुद्धा ते तितक्याच निष्ठेने उभे राहिले.
समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना काकांच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रतापगड सहकारी साखर कारखाना,यासह विविध ठिकाणी नोकरी मिळावी यासाठी अण्णांनी निस्वार्थीपणे प्रयत्न केले.
कुडाळच्या शिंदे घराण्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांची एकजूट कायम ठेवण्यासाठी अण्णांचा नेहमीच प्रयत्न होता .एखाद्या सहकारी कार्यकर्त्यांची काही अडचण असेल किंवा गैरसमज झाला असेल तर अण्णांची याकामी मोलाची मदत होत होती.संपूर्ण प्रतापगड परिवारातील कार्यकर्ते, कामगार यांची एकजूट कायम ठेवण्यात अण्णांचा नेहमी प्रयत्न होता.त्यांचे लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता.सर्वसामान्य जनतेचा आधारवड अशीच अण्णांची ओळख होती.
निस्वार्थीपणे लोक हितासाठी झटणाऱ्या अण्णांनी रविवारी पितृदिनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.