
सूर्यकांत जोशी कुडाळ –
कुडाळ जिल्हा परिषद गटात व गणात आता निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असो उमेदवारांचे प्रचाराची एक फेरी पूर्ण होत आलेली आहे. जसजसे मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तशी निवडणुकीचे रंग बदलू लागले आहेत ही निवडणूक आता पक्षीय पातळीवर न राहता गाव पातळीवरील गटांमध्ये येऊ लागल्याचे चित्र आहे आज महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र शिंदे यांच्या प्रचारात सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (दिशा) कमिटीचे सदस्य व कुडाळचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे व त्यांचे बंधू चंद्रसेन शिंदे यांनी थेट सहभाग घेतला त्यामुळे कुडाळ पंचायत समिती गणात चुरस अधिक वाढली आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटात भाजपाच्या जयश्री गिरी,महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी पक्षातून पुनम नायकुडे व अपक्ष म्हणून जयश्री शेवते या निवडणूक लढवत आहेत.त्याचबरोबर कुडाळ गणातून भाजपचे सौरभ राजेंद्र शिंदे व महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादीतून राजेंद्र रामचंद्र शिंदे, शिवसेना (उबाठा)तर्फे प्रशांत मारुती तरडे व वंचित बहुजन विकास आघाडी कडून राजेंद्र खाशाबा शेवते निवडणूक रिंगणात आहेत. कुडाळ गटात तिरंगी तर कुडाळ गणात चौरंगी लढत होत आहे. कोण किती मते घेतो आणि कोण कोणाची मते खेचतो यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असून निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत येऊ लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दररोज नवीन राजकीय समीकरणे पुढे येऊ लागली असून पुढे अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाऊ लागले आहे. या निवडणुकीने आता पक्षीय रंग बदलून स्थानिक राजकारणाकडे वाटचाल सुरू केली आहे असे दिसून येत आहे. कुडाळ गटातील अन्य गावांच्या तुलनेत कुडाळ हे गाव राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते त्यामुळे कुडाळचे बहुमत कोणाकडे वळते हे या निवडणुकीच्या निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे.