Monday, April 6, 2026
Homeहवामानसातारा जिल्ह्यात धरणे भरली, पण १२% पावसाची तूट! पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या सावटाची...

सातारा जिल्ह्यात धरणे भरली, पण १२% पावसाची तूट! पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या सावटाची नांदी: शेतकरी चिंतेत; उपाय योजना आवश्यक

सूर्यकांत जोशी कुडाळ – 9421214450

         ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने एक विचित्र परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरलेला दिसत असला तरी, मान्सूनच्या एकूण पर्जन्यमानात मात्र मोठी घट झाली आहे. जून ते सप्टेंबर या मुख्य मान्सून हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १२% पावसाची तूट  नोंदवण्यात आली आहे.सरासरी ८८६ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत, यावर्षी केवळ ७८४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही तूट केवळ आकडेवारी पुरती मर्यादित नसून, आगामी काळात पाणीटंचाई आणि अप्रत्यक्ष दुष्काळाचे सावट निर्माण करणारी आहे.


असमान वितरणामुळे चिंता वाढली

           जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत असमान राहिले आहे. पाटण, महाबळेश्वर, जावली आणि सातारा तालुक्यांसारख्या जास्त पावसाच्या भागांमध्येच पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे, कृषी उत्पन्न अवलंबून असलेल्या अनेक भागांत भूजल पातळी  अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर आणि पुढील उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर होणार आहे.


               धरणे भरलेली असली तरी, पर्जन्यमानातील ही घट सूचित करते की पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, ज्यामुळे भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ शकते.

शेतकऱ्यांचे लक्ष ‘पीक विमा’ आणि ‘सरकारी मदती’कडे

             मान्सूनच्या या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक भागांत पेरण्या उशिरा झाल्या, तर काही ठिकाणी पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी, शेतकऱ्यांचे लक्ष आता पीक विमा योजनेकडे लागले आहे. झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल का, याबाबत शेतकरी चिंतेत आहेत.
                 तसेच, शेतकरी कर्जमाफी आणि सरकारी मदत यांसारख्या तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने या पावसाच्या तुटीची गंभीर दखल घेऊन तातडीने जल व्यवस्थापनाचे नवीन धोरण आखणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही १२ टक्क्यांची तूट भविष्यातील पाणीटंचाई आणि शेतीच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करू शकते, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page