मार्ली घाटात एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणातील संशयिताला सात दिवसांची पोलीस कोठडी
आज दोघांचे सांगाडे पोलिसांना मिळाले
सूर्यकांत जोशी कुडाळ – गेले चार दिवस गाजत असलेल्या जावली तालुक्यातील मार्ली घाटातील एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणी पोलिसांनी सोमर्डी ता.जावली येथील संशयित आरोपी योगेश निकम यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे आज संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
मार्ली घाटात खून झालेल्या मध्ये तानाजी विठोबा जाधव (वय 55), पत्नी सौ. मंदाकिनी जाधव (वय 50), मोठा मुलगा तुषार जाधव (वय 26) व छोटा मुलगा विशाल जाधव (वय 20) यांचा समावेश आहे. हे सर्वजण दत्तनगर, बामणोली, ता. मिरज, जि. सांगली येथील राहणारे आहेत.
दरम्यान या प्रकरणातील खून झालेल्या पती पत्नींच्या मृत देहाची ओळख यापूर्वीच त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान याच परिसरातून काल सोमवारी एक व आज मंगळवारी एक असे दोन हाडांचे सांगाडे पोलिसांना सापडले .याकामी आ.शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स व महाबळेश्वर ट्रेकर्सनी महत्वपुर्ण मदत केली.
दरम्यान घटनास्थळी आज जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली. याघटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके करत आहेत. हे सर्व खून आर्थिक देवाण घेवाणीतून झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नोकरी लावण्यासाठी पैसै घेऊन संबंधित संशयित आरोपीने अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.