Friday, April 3, 2026
HomeTop Newsमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कावडी गावाची प्रेरणादायी वाटचाल : जिद्द आणि चिकाटीच्या...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कावडी गावाची प्रेरणादायी वाटचाल : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धेतील विजेतेपदाचे  प्रबळ दावेदार: कावडीला भेट देणाऱ्या प्रत्येकालाच वाटते आपलाही गाव असाच स्वच्छ सुंदर व सुविधांनी युक्त असावा.


सूर्यकांत जोशी कुडाळ –
              जावली तालुक्याच्या वायव्य कोपऱ्यात पाचगणीच्या पायथ्याशी वसलेले साधारणतः 250 लोकसंख्येचे कावडी हे गाव आहे. या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात भाग घेऊन गावचा चेहरा मोहरा बदलला आहे.या अभियानाच्या निकषानुसार असणाऱ्या सुविधांसोबतच त्यापेक्षाही जास्तीचे काम या गावाने केले आहे त्यामुळे या अभियानात असणाऱ्या पाच कोटींच्या बक्षिसाचा बहुमान या गावाला मिळेल असाच विश्वास व्यक्त होतो.
            हातगेघर धरणात पूर्ण बाधित झालेल्या या गावाने पुन्हा उभारी घेत धरण क्षेत्राच्या लगत नवेगाव बसवले. धरणात पूर्ण बाधित असल्याने धरणग्रस्तांच्या साठी असणारे सर्व लाभ या ग्रामस्थांनी मिळवले आहेत.या गावाला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासारखे कणखर व दूरदृष्टी आणि कल्पनाशक्ती असणारे नेतृत्व लाभले आहे.हे नवीन गाव बसवताना त्यांनी शासन आणि प्रशासनाला हाताशी धरलेच त्याचबरोबर नामदार शिवेंद्रसिंह राजेंशी असणाऱ्या जवळीकेचा जास्तीत जास्त फायदा घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या राजकीय वजनाचा फायदा करून तालुक्यातील छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर,विविध क्षेत्रात कार्यरत असणारे उद्योजक यांच्याकडूनही देणगी मिळवली.गावातील लोकांनी अगदी अबाल वृद्धांनी  महिलांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करताना संकोच बाळगला नाही. मुंबईत मध्ये असणाऱ्या नोकरदारांनी सुद्धा शनिवार रविवारी व सुट्टीच्या दिवशी गावाकडे धाव घेऊन गावच्या विकासाच्या या यज्ञात सहभाग नोंदवला. ज्या ठिकाणी शासकीय निधी मिळत नाही, पैसे मिळत नाही त्या ठिकाणी लोकवर्गणी कमी पडत असेल तर मानकुमरे कुटुंबियांनी स्वतःचे पैसे वापरले आणि हा गाव उभा केला. राजकारण म्हणून जरी कोणी टीकाटिप्पणी करत असेल तरीसुद्धा मानकुमरे यांनी आपल्या कल्पनाशक्ती आणि जिद्दीने उभा केलेला गाव हा त्या नेतृत्वाच्या कर्तृत्वाची साक्ष देणाराच आहे.
         सह्याद्री पर्वतांच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात हे गाव वसले आहे.गावच्या प्रवेशद्वारातच हातगेघर धरणाचा पाणीसाठा या गावाला वरदान ठरत आहे.याचा फायदा घेत भविष्यात कावडी हे गाव पर्यटकांना खुणावेल अशी व्यवस्था मानकुमरे संकल्पनेतून साकारलेली दिसते. या धरणालगत  सेल्फी पॉइंट बनवला आहे. वसंतराव मानकुमरे यांनी गावासाठी दिलेल्या या योगदाना प्रित्यर्थ या सेल्फी पॉइंट वरती वसंत नगर असे नाव करण्यात आले आहे हे भाऊंच्या कर्तृत्वाची साक्ष देते आणि त्यांच्या प्रति ग्रामस्थांच्या असणारे प्रेम दिसून येते. गावच्या प्रवेशद्वारातच ओपन जिम  ओपन जिम  आहे. सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी फिरायला येणारे ग्रामस्थ या ठिकाणी व्यायाम करताना दिसतात म्हणजे ओपन जिम च्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.
         गावातील प्रत्येक नागरिकांनी झाडे लावली आहेत.या झाडांचा पूर्ण खर्च आणि संगोपनाची जबाबदारी या नागरिकांनी घेतली आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी ही झाडे लावून त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचे नाव लिहिले आहे.अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने त्यांनी हे स्मृती उद्यान बनवून आपल्या पूर्वजांचे भावनिक नाते आणि स्मृती जपल्या आहेत. ही वृक्ष संपदा जेव्हा मोठे होऊन डौलाने डोलेल त्यावेळी या ठिकाणी नंदनवन झालेले दिसेल. यातीलही विशेष असेल की कावडी गावाला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त आवळ्याचे झाडे लावण्यात आले आहेत भविष्यात हे गाव आवळ्याचे गाव म्हणून लौकिक प्राप्त करेल अशी संकल्पना मांडली गेली आहे.


        मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आवश्यक असणाऱ्या निकषानुसार गावचे सुशोभीकरण योग्य रीतीने करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापन,पशुवैद्यकीय दवाखाना, व्यायाम शाळा, मोफत पिठाची गिरण, शुद्ध पाण्यासाठी एटीएम,प्राथमिक शाळेची सुसज्ज इमारत, बालोद्यान,वाचनालय, गावचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवताचे आकर्षक मंदिर त्यासमोरच भले मोठे सभागृह,इत्यादी सुविधा सोबतच,पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, क्रीडांगण यामध्ये हॉलीबॉल फुटबॉल बास्केट बॉल इत्यादी सुविधा करण्यात आल्या.


        येथील ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा अत्यंत आधुनिकतेने नटलेले आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचे संपूर्ण संघाने संगणकीकरण करण्यात आले आहे अगदी लोकांची घरपट्टी पाणीपट्टी यासाठी क्यूआर कोड देण्यात आले आहे त्यामुळे ग्रामपंचायतीत येऊन कर भरणा करण्याची आवश्यकता राहिली नाही अगदी ग्रामस्थांच्या काही अडीअडचणी असल्या तक्रारी असल्या तरी सुद्धा ते ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवर मांडू शकतात अशी व्यवस्था केली आहे जेमतेम अडीचशे लोकसंख्येचे हे गाव आहे. या डोंगर कपारीत राहणाऱ्या लोकांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि भावस्पर्शी आहे हे तेथे प्रत्यक्ष गेल्यानंतर जाणवते.
         निसर्गाने दिलेल्या वर्णनाला कर्तुत्वाची जोड देत पर्यटनाच्या माध्यमातून भावी पिढीला रोजगाराची संधी प्राप्त व्हावी यासाठीही या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. माणसाचे जीवन आनंदी समृद्ध असावे त्याचबरोबर मेल्यानंतर सुद्धा त्या मृतदेहाला सन्मानाने निरोप देता यावा यासाठी सुंदर अशी स्मशानभूमी तयार केली आहे.जवळच प्रेक्षक गॅलरी उभी केली आहे.म्हणजे  मृतदेहाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या सग्या सोयऱ्यांना बसण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली आहे.खरोखरच या सर्व सुविधा किंवा या संकल्पना सूचनासाठी त्या लोकांसमोर मांडण्यासाठी आणि त्या प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी त्या नेतृत्वाची असणारे जिद्द चिकाटी आणि त्याला मिळालेले लोकांचे साथ खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.


         या गावाला भेट दिल्यानंतर खरोखरच आपल्याही गावात अशा सुविधा असल्या पाहिजेत अशी भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गावचे नेतृत्व सुद्धा वसंतराव मानकुमरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या गावात सुद्धा अशाच सोयी सुविधा निर्माण व्हावेत अशीच अपेक्षा प्रत्येक ग्रामस्थांची राहील.
     राजकारण म्हणून कदाचित कोणी नावे ठेवेल किंवा उणे धुणे काढेल परंतु त्यापेक्षा असलेल्या अधिकारांचा वापर करून आपले नेतृत्व पणाला लावून अत्यंत कौशल्याने वसंतराव मानकुमरे व कावडी ग्रामस्थांनी  केलेल्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page