Monday, April 6, 2026
HomeTop Newsमेढा पोलीसांची अजब कहाणी; हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी हवंय चहापाणी ;

मेढा पोलीसांची अजब कहाणी; हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी हवंय चहापाणी ;

सूर्यकांत जोशी कुडाळ – आपला तीस वर्षांचा मुलगा अचानक गायब झाल्याने हवालदिल बापाने खबर देण्यासाठी कुडाळ पोलीस दूरक्षेञात धाव घेतली. पण त्याठिकाणी असलेल्या उंच व टक्कल असलेल्या पोलीसाने आपणास चहापाण्यासाठी हजार रुपये मागितले . आपण त्यांना पैसै दिले नाहीत.त्यामुळे मुलाचा शोध पोलीस घेतील याची शाश्वती नसल्यामुळे जिल्हा पोलिस मुख्यालयात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.त्या नंतर मेढा व कुडाळ पोलीसांची धावाधाव सुरू झाली असल्याची अनाहुत माहिती  संबंधित मुलाच्या वडिलांनी दैनिक ऐक्य प्रतिनिधिंशी बोलताना दिली.

            मेढा पोलीसांचे चांगले वाईट प्रताप नेहमीच चर्चेत असतात.पोलीसांकडुन झालेल्या चांगल्या कामगिरीचे जावली तील जनतेने खुल्या दिलाने स्वागतही केले आहे.अवैध व्यवसाय तालुक्यात पोलीसांच्या मेहरबानीने सुरू असल्याचे सर्वंश्रुत आहे.पण नडलेल्या, खचलेल्या , गोरगरीब जनतेला नाडण्याचा असला किळसवाणा प्रकार येथील जनता कदापी सहन करणारी नाही.

           याबाबतची माहिती अशी, प्रकाश दिनकर तरडे या.कोलेवाडी, या.जावली हे वयाच्या साठीच्या आसपासचे गृहस्थ माझ्या फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढण्यासाठी आले होते.चेहर्यावर  तणाव दिसत  होता आणि वागण्यातील साधे पणा  त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देत होता.यावेळी त्यांच्याकडे सहज  विचारणा केल्यावर त्यांनी आपले दुःख मनमोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली.

          प्रकाश तरडे यांचा तीस वर्षे वयाचा मुलगा दि. १९/११/२१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरातून बाहेर गेला. तो परत आलाच नाही.दोनदिवस त्यांची शोधाशोध केली परंतू न सापडल्याने तरडे यांनी दि. २२/११/२१ रोजी कुडाळ पोलीस दूरक्षेञात मुलगा हरवल्याची खबर दिली.यावेळी पोलीस दूरक्षेञात डोक्यावर टक्कल आणि उंच असलेल्या पोलीसाने आपणास चहापाण्यासाठी एक हजार रुपये मागितले.पण आपणाकडे पैसै नसल्याने ते देऊ शकलो नाही.

          पैसे दिले नसल्याने आपल्या मुलाचा शोध   होणार नाही याची काळजी वाटल्याने त्यांनी सातारा येथील पोलिस मुख्यालयात जाऊन वरीष्ठ अधिकार्यांकडे आपली कैफियत मांडली.त्यानंतर तिथून मेढा आणि कुडाळ ला फोन आल्यावर पोलीसांची सुञे हलू लागली.पण मुलाचा शोध अद्याप लागला नाही.

            त्या बाबांना कदाचित मी पञकार असल्याचे ठाऊक नसावे.त्यामुळे ते मनमोकळेपणाने बोलले. अनेकदा मदतीसाठी धावणार्या पोलीसातील माणसाचे दर्शन होते आणि त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होतो.पण जर असा कोणी  तालुक्यातील गोरगरिबांना नाडणार असेल तर त्याची उचलबांगडी झाली पाहिजे.याप्रकरणाची  सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page