सूर्यकांत जोशी – जावली तालुक्यातील मेढा येथील सहा.दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे.काही सबबी सांगून दस्त नाकारले जातात परंतु आर्थिक तडजोड होताच तेच दस्त नोंदवले जात आहेत . असे निदर्शनास येत असून या कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हा मुद्रांक अधिकारी सातारा यांचे कडे केली आहे.
जावली तालुक्यात डोंगर दर्यात राहणारी जनतेला कायद्याचे तितकेसे ज्ञान नाही. दस्तासाठी आवश्यक मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरायचे असताना येथे रोख रक्कम घेतली जात आहे. त्याच बरोबर वरिष्ठाना पैसे द्यावे लागतात असे सांगून जादा रकमेची मागणी केली जाते.गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयात अशा प्रकारे गैर कारभार सुरु असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या दस्ताची चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी या निवेदनात केली आहे.
