

सूर्यकांत जोशी | कुडाळ
सातारा जिल्हा परिषदेच्या म्हसवे गटात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवून दिली असून, जावळी तालुक्याच्या राजकारणात भाजपचा झंजावात सुरू झाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. जावळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, म्हसवे पंचायत समिती गणातून रेश्मा समाधान पोफळे आणि हातगेघर गणातून गोरख महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजपच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या वेळी म्हसवे गटातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंतराव मानकुमरे यांच्या कावडी गावातून रॅलीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या झेंड्यांच्या सागरात ही रॅली संपूर्ण मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने मेढा येथे येऊन धडकली. या शक्तीप्रदर्शनामुळे मेढा शहराला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जावळी तालुक्यातील निवडणुकीत वसंतराव मानकुमरे हे नेहमीच आपला वेगळा करिष्मा दाखवत आले आहेत. एका निवडणुकीत त्यांनी गट व गण अशा तीन उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याचा राजकीय चमत्कार घडवला होता. अनेकदा विरोधी पक्षाचे उमेदवार कोण असावेत, याची दिशा ठरवण्याची ताकद मानकुमरे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खुलेआम होते. गेली चार दशके जावळी तालुक्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने आणि लोकसंपर्काने त्यांनी समाजमान्यता मिळवली असून, सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पंचायत समिती गणात सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पोफळे यांचे कार्यही तितकेच उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या पत्नी रेश्मा पोफळे या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. तसेच हातगेघर गणातून गोरख महाडिक यांचा युवा वर्गातील प्रभाव भाजपसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
या तिन्ही उमेदवारांच्या माध्यमातून म्हसवे गटात भाजपाने मजबूत पकड निर्माण केली असून, येत्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पक्षाचे पूर्व मंडल अध्यक्ष संदीप परामणे यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
