सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील हुमगांव करहर विभागाला वरदान ठरणारा हुमगांव ते बावधन रस्ता गेल्या चाळीस वर्षांपासून लाल फितीच्या कारभारात अडकला आहे.या विभागाला वाई शहराशी जोडणारा हा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्याच्या कामात असणारे कागदोपत्री अडथळे दूर करुन रस्ता तातडीने होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी मागणी या विभिगातील जनतेतून होत आहे.
शाळा, महाविद्यालय, शेतीमालाला बाजारपेठ,दवाखाने , यिसह अनेक कारणांसाठी या विभागातील जनतेला वाई अथवा सातारा या मोठ्या शहरांवर अवलंबून रहावे लागते.सध्या या विभागातील जनतेला वाई अथवा सातारा या शहरांकडे येण्यासाठी पाचवड मार्गे सुमारे पस्तीस ते चाळीस किलोमीटर वळसा घालून जावे लागते.त्यासाठी हुमगांव ते बावधन रस्ता झाल्यास हेच अंतर जेमतेम दहा ते पंधरा किलोमीटर रहाणार आहे.
जावली तालुक्यावर निसर्गाने सौंदर्याची भरभरून उधळण केली आहे. या तालुक्यात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला हेवा वाटावा असा हा भाग आहे.तालुक्यात कोयना,कण्हेर,महू, हातगेघर या चार धरणांचा पाणीसाठा पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना खुणावत आहे.अतिशय समृद्ध असा नजारा उपलब्ध असताना दुर्दैवाने या भागाचा ज्या गतीने विकास झाला पाहिजे होता त्या पध्दतीने तो झाला नाही. शेजारील महाबळेश्वर पाचगणीमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल पण येथील उलाढाल शुन्य राहिली.परंतू तालुक्यातील मेढा ते कुडाळ आणि पाचवड ते पांचगणी या प्रमुख मार्गावरील रस्त्यांची वाताहत झाली असल्याने पर्यटक जावली तालुक्यातून जाण्या ऐवजीं वाई मार्गे महाबळेश्वर व पाचगणी कडे जातो. वास्तविक तालुक्याची भौगोलिक रचना एवढी विचित्र की कोणताच भाग कोणाशी जोडलेला नाही . तालुक्यात एकसुद्धा मोठे शहर नाही त्यामुळे तेथे विकास नाही .रोजगाराच्या संधी नाहीत त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या बाजारपेठेसाठी हॉस्पिटलसाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहण्याची वेळ या तालुक्यावर आली आहे. सातारा व वाई ही शहरे सुद्धा तीस किलोमीटरच्या अंतरावर असल्याने ऐंशीच्या दशकात हुमगाव ते बावधन रस्ता होण्याची मागणी जनतेतून पुढे आली. पूर्वीपासून येथील जनतेचा वाई तालुक्याशी व्यापाराच्या ,दवाखान्याच्या माध्यमातून तसेच धार्मिक बाबीतून वाईशी संबंध येतो. दरवर्षी श्रावणी सोमवारनिमित्त देवांना स्नानासाठी देवाच्या पालख्या घेऊन अनेक जावळीकर हुमगांव ते बावधन या डोंगर मार्गे वाईच्या कृष्णा नदीवर जातात. पूर्वी जावली तालुक्यातील न्यायदानाचे कामसुद्धा वाईच्या न्यायालयातूनच चालत होते.
या सर्व कारणांमुळे हुमगाुव बावधन रस्ता होणे ही काळाची गरज बनली पण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी चाळीस वष्रे झाली ही मागणी धूळखात पडली आहे.आ.शशिकांत शिंदे यांनी ते जावली तून लोकप्रतिनिधीत्व करत असताना हुमगांव पासून डोंगराच्या पायथ्या पर्यंत रस्ता नेहला परंतू पुढे वनविभाग व वाई तालुक्याची हद्द असल्याने या रस्त्याचे काम ठप्प झाले.त्यानंतर आज अखेरपर्यंत यामध्ये काहीही प्रगती झाली नाही
लोकप्रतिनिधींची केवळ आश्वासने व भूलथापा. संदीप पवार
आतापर्यंत चाळीस वर्षांतील राजकीय मंडळींची यासंदर्भातील विधाने जर तपासून बघितली तर असे वाटते की पुढील सहा महिन्यांच्या आत या रस्त्याने वाहतूक सुरु होणार आहे .जावलीकरांना किती सहजतेने फ़सवता येते हे या राजकीय विधानाने सिध्द होते . आणि दुर्दैवाने यांना जावळीकर फसत आलेले आहेत. हुमगांव ते बावधन रस्त्याच्या प्रगती करता आजपर्यंत कोणी जावलीचा वाघ डरकाळी फोडून उभा राहिला नाही किंवा तालुक्याचे तारणहार किंवा कार्यसम्राट जागे झाले नाहीत. फक्त वल्गना मोठ्या मोठ्या झाल्या खरे तर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी किंवा जावलीच्या विकासाचा ठेका आम्हीच घेतला अशा गर्जना करणार्यांनी अथवा जावलीचे भूमिपुत्र आम्हीच असे म्हणणाऱ्यांनी हे हुमगाव बावधन रस्त्याचे शिवधनुष्य उचलून घ्यावे .असे आवाहन शिव उद्योग समुहाचे जिल्हाध्यक्ष संदीप पवार यांनी केले आहे.