
सूर्यकांत जोशी कुडाळ :
मोबाईलच्या निळ्या प्रकाशात हरवत चाललेल्या बालमनांना पुन्हा पुस्तकांच्या सुवासात घेऊन जाणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम जावळी तालुक्यातील खर्शी गावात साकार झाला आहे. समाजातील वाचनसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या सौ. वंदना सुहास भोसले व माजी सरपंच सौ. स्मिता सचिन भोसले यांनी एक आदर्शवत वाटचाल केली आहे.
आपल्या सासू व आईसमान कै. सौ. पद्मावती हणमंतराव भोसले यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी जावळी तालुक्यातील खर्शी, सायगाव, आनेवाडी, रायगाव, महिगाव, दरेखुर्द, भणंग, बिभवी आदी गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना तब्बल एक हजार एकशे अकरा (११११) वाचनयोग्य पुस्तकांचे मोफत वाटप केले.
या पुस्तकांमध्ये केवळ गोष्टी नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा जोतीबा फुले, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांचे प्रेरणादायी चरित्रग्रंथ, इंग्रजी कविता संग्रह, बोधकथा व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके यांचा समावेश होता. परिसरातील वाचनालयांनाही स्पर्धा परीक्षांचे संच भेट देण्यात आले.
या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना एक भावनिक आवाहन करण्यात आले —
“आपल्या पुढील वाढदिवशी केकऐवजी एका मित्राला किंवा शाळेला एक पुस्तक भेट द्या”, असा सकारात्मक संकल्प मुलांकडून करून घेण्यात आला. या छोट्याशा शब्दांनी बालमनांमध्ये वाचनाविषयी प्रेमाची नवी ज्योत पेटली.
मोबाईलच्या आहारी जाणाऱ्या पिढीला पुस्तकांकडे परत नेणारे हे पाऊल संपूर्ण जावळी तालुक्यासाठी आशेचा किरण ठरत आहे.
“हातात मोबाईल नव्हे, पुस्तक असावे” हा संदेश देणारा हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता आता एक चळवळ होऊ पाहतो आहे.
या उपक्रमाला तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावागावात वाचनसंस्कृतीचे बीज रोवले जात आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच या उपक्रमाची खरी पावती ठरत आहे.
कार्यक्रमास सरपंच हसिना मुजावर, ग्रामसेवक रजनिकांत गायकवाड, उपसरपंच समाधान गायकवाड, अनिता गायकवाड, मनोज तावरे, धैर्यशील मोहिते, शैलेश बगाडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(विशेष मत):
> “आजच्या मोबाईलच्या युगात मुलांच्या हातात पुन्हा पुस्तक देणं ही केवळ चांगली गोष्ट नाही, तर समाजाची जबाबदारी आहे. पुस्तक म्हणजे फक्त पानांचा गठ्ठा नाही, ते विचारांची खिडकी उघडणारी किल्ली आहे. वंदनाताई भोसले व त्यांच्या कुटुंबियांनी केलेला हा उपक्रम भविष्यातील पिढी घडवणारा आहे.”
— स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, भुईंज पोलीस स्टेशन