सूर्यकांत जोशी कुडाळ – कडक लाॅकडाऊन करून सुद्धा कोरोना आटोक्यात येत नाही. अनेकजण नियम डावलून अनावश्यक कारणांसाठी मोकाट फिरत आहेत.समजाऊन सांगूनही न ऐकणारांना आज मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने व कुडाळ दूरक्षेत्राचे पीएसआय कदम यांनी चांगलाच दणका दिला.दंडात्मक कारवाईसह सर्वांची कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणीसाठी रवानगी करण्यात आली.पोलिसांच्या या कारवाईमुळे आता विनाकारण रस्त्यावर फिरणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून शासनाच्या अनावश्यक सेवेत नसणारे व्यवसाय बंद आहेत.तर जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय सेवा वगळता किराणा दुकानांसह अत्यावश्यक सेवेतील दुकाने गेल्या महिनाभरापासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत.तर या आठवड्यात आणखी कडक लाॅकडाऊन केले आहे.नियमानुसार असणारे सर्व वैध व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत.त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे.हे सर्व निर्बंध लोकांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी घातले आहेत.परंतू काहीजण आपल्या बेजबाबदार पणा मुळे प्रशासनाच्या निर्बंधांना हरताळ फासत आहेत.
समजावून सांगून न ऐकणारांना आता पोलिसी खाक्या दाखवाव्यात लागणार आहे.कारण अगदी मोजक्या लोकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सगळ्यांना बसत आहे.सपोनि अमोल माने आज सकाळी पासून संपूर्ण तालुक्यात फिरुन लोकांना घरात थांबण्याचे आवाहन करत होते.तर मेढा आणि कुडाळ येथे नाकाबंदी करण्यात आली होती. जावली तालुक्यातील नव्वद पंचावन्न टक्के लोक शेतकरी आहेत.सध्या शेतात खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. अनेकांना दुध वितरण,गुरे चारण्यासाठी शेतात जावेच लागते . याशिवाय वैद्यकीय कारणांसाठी सुद्धा अनेकांना बाहेर यावे लागत आहे .त्यामुळे नाकाबंदी करणार्या पोलिसांना लोकांच्या बाहेर पडण्याच्या कारणांचीही दखल घ्यावी लागत आहे.