वीरजवान तेजसचे पार्थिव येण्याकडे जावली करांचे डोळे :रविवारी सकाळी नऊ वाजता होणार अंत्य संस्कार
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील करंदोशी येथील वीर जवान तेजस मानकर यांचे पार्थिव येण्याकडे ग्रामस्थांसह जावळीकरांचे डोळे लागले आहेत. रविवारी सकाळी सात वाजता पाचवड ता. वाई येथून अंत्य यात्रेला सुरुवात होणार असून सकाळी नऊच्या दरम्यान अंत्य संस्कार होतील अशी माहिती करंदोशी ग्रामस्थांनी दिली आहे.
पंजाब येथील भटिंडा सैन्य तळावर सेवा बजावत असताना झालेल्या गोळीबारात तेजसला वीरमरण आले होते. यात्रेला गावी आलेल्या तेजसने केवळ पाच दिवसांपूर्वी सर्वांचा घेतलेला निरोप अखेरचा निरोप ठरला. तेजसच्या अचानक जाण्याने संपूर्ण करंदोशी गाव पंचक्रोशी शोक सागरात बुडाली आहे. कालपासून गावात कोणाची चूल पेटली नाही. त्याच्या आठवणी सांगताना त्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईकांना अश्रू अनावर होत आहेत.जवान तेजसच्या चाहत्यांनी जागोजागी वीर जवान अमर रहेचे बॅनर लावले आहेत.
दरम्यान करंदोशी गावा नजिक पाचवड मेढा रस्त्या लगत असणाऱ्या शेतात तेजसच्या अंत्य संस्काराची तयारी ग्रामस्थांनी केली आहे.रविवारी पहाटे पर्यंत तेजसचे पार्थिव पाचवड येथे पोहचेल. सकाळी सात वाजता अंत्य यात्रेला प्रारंभ होईल. अमृतवाडी, सरताळे, कुडाळ मार्गे अंत्य यात्रा करंदोशी येथे पोहचणार आहे.