सूर्यकांत जोशी कुडाळ -पंजाब भटिंडा येथील सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात तेजस मानकर याला वीरमरण आले होते. याच्यावर आज जावली तालुक्यातील करंदोशी या जन्म गावी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले.आपल्या लाडक्या केवळ बावीस वर्षाच्या उमद्या जवानाला हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला यावेळी वीर जवान तुझे सलाम, तेजस मानकर अमर रहेच्या घोषनांनी आसमंत भारावून गेला होता.
वडील सेवानिवृत्त सुभेदार मेजर, भाऊ ओंकार कर्नल , चुलते सैन्य दलात असल्याने सैनिकी शौर्याची पार्श्वभूमी असलेल्या घरातील तेजस मानकर दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाला होता. प्रशिक्षण संपल्यानंतर सहामहिन्यापूर्वी त्याची पंजाब येथील भटिंडा सैन्य तळावर नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यातच तो करंदोशी या आपल्या गावी यात्रेला आला होता. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन तो नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अज्ञाताकडून झालेल्या गोळीबारात तेजसला वीरमरण आले.
जवान तेजस चे पार्थिव रविवारी पहाटे पाचवड या ठिकाणी आले. तिथून खास सजवलेल्या वाहनातून तेजसच्या पार्थिवाच्या अत्यं यात्रा मिरवकणुकीस प्रारंभ झाला.आपल्या भागातील जवानाला पाचवड अमृतवाडी सरताळे म्हसवे कुडाळ सोनगाव भिवडी नेवेकर वाडी इत्यादी गावांच्या वतीने पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
देशसेवा करताना तेजस शाहिद झाला -लहुराज मानकर : आमच्या घरात सैनिकी परंपरा असल्याने सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय तेजसने स्वयं स्फूर्तीने घेतला होता. वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्या अगोदरच पहिल्याच प्रयत्नात त्याची निवड झाली. तो मनमिळाऊ तसेच हरहुन्नरी असल्याने कुटुंबातील सर्वांचा लाडका होता. नातेवाईक आणि ग्रामस्थांनाही त्याचा खूप लळा होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजल्या नंतर पंजाब भतींडा येथील सैन्य तळावर आपण गेलो होतो. तिथे सुद्धा त्याने सर्वांची मने जिंकली होती. तेथील वरिष्ठ व त्याचे सहकारी त्याला प्रेमाने छोटू म्हणतं होते असे त्याच्या सहकार्यांनी सांगितले.या आठवणी सांगताना कंठ दाटून येत होता. शब्द फुटत नव्हते.पोटचा मुलगा गेल्याचे दुःख आहे परंतु त्याने देशासेवा करताना बलिदान दिल्याचा अभिमान असल्याचे वडील लहुराज मानकर यांनी सांगितले.
बुधवारी सकाळीच मी त्याच्याशी फोन वर बोललो होतो. त्यावेळी त्याने अदाल्यादिवशी झालेल्या हल्यात चार जवान शहीद झाल्याने सर्वाना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.आणि मी सज्ज आहे. काळजी करू नका असे त्याने सांगितले. परंतु त्यानंतर नेमके काय घडले याचा तपास सुरु असल्याचे लहुराज मानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सांगितले.
तेजसचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी करंदोशी येथे त्याचा घरी आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.त्यानंतर तेजसचे पार्थिव नातेवाईकांना अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले. तेजसचा विवाह झाला नसल्याने त्याच्या पार्थिवाचा हिंदू धर्म शास्त्रानुसार अर्क विवाह करण्यात आला.यावेळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.त्यानंतर त्याचे पार्थिव अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आले. त्याठिकाणी भर बाराच्या रणरणत्या उन्हात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
सैनिकी परंपरे नुसार सर्व सोपस्कार करून पोलिसांच्या वतीने मानवंदना देऊन. बंधूकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहीद जवान तेजस मानकरच्या पार्थिवावर पुष्प चक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार शशिकांत शिंदे, व्यसन मुक्त संघांचे नेते विलासबावा जवळ यांनी श्रद्धांजली वाहिली.तहसीलदार राजेंद्र पोळ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार, शिक्षण सभापती अमित कदम, माजी सभापती जयश्री गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जाणवे खराडे, सपोनि संतोष तासगावकर. आर्मीचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.
मानकर कुटुंबियांचे देश सेवेत मोठे योगदान – खा. श्रीनिवास पाटील – स्वतः देशसेवेत सुभेदार मेजर पर्यंत मजल मारून आपले दोन्ही पुत्र देश सेवेसाठी देणारे मानकर कुटुंबातील आदर्श घेण्या सारखा आहे.दुर्दैवाने देशासेवेचे स्वप्न पाहणारा बावीस वर्षाचा कोवळा तरुण आपल्यातून अचानक निघून जाणे अतिशय दुःखद आहे. या प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी सर्वांनी धीर द्यावा.
मानकर कुटुंबियांना न्याय मिळवून देणार – खा. उदयनराजे भोसले -सातारा जिल्ह्याला सैनिकी परंपरा आहे. अनेक तरुण देश सेवेचे ध्येय उराशी बाळगून सैन्य दलात भरती होत आहेत. त्याच प्रमाणे तेजसही आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेहण्याचे ध्येय उराशी बाळगून सैन्य दलात दाखल झाला. परंतु एवढ्या कोवळ्या वयात त्याला दुर्भाग्य पूर्ण वीर मरण आले. त्याठिकाणी काय घडले याचा पाठ पुरावा करून आपण मानकर कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.