कुडाळ – गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीने शेती उत्पादन शाश्वत राहिले नाही.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन किफायतशीर शेती शेतकऱ्यांनी करावी असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
कुडाळच्या गजराज मित्र मंडळाने गणेश जयंतीचे औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमा बरोबरच शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करुन एक स्तुत्य व आदर्शवत उपक्रम राबवला आहे असे गौरवोद्गार आ.शिंदे यांनी काढले.
गणेश जयंती उत्सवाचे औचित्य साधून कुडाळ येथील गजराज मित्र मंडळ व भैरवनाथ कृषी सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इफको कंपनीने विकसित केलेल्या द्रवरूप नॅनो युरिया उत्पादनाचे प्रात्याक्षिक व इतर शेती विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी जावली पंचायत समितीच्या सभापती सौ जयश्री गिरी , उपसरपंच सोमनाथ कदम, उत्तम शेलार , जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भाऊराव शेवते,भिकू राक्षे, धनंजय केंजळे व मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱी मेळावे घेण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा. सौरभ शिंदे
गजराज मित्र मंडळाने आयोजित केलेल्या शेतकरी चर्चा सत्राला जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी भेट दिली . यावेळी प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे उपस्थित होते.
शेती क्षेत्रात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सहकारी सोसायट्या आणि विविध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे . त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे उपसभापती सौरभ शिंदे यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पवार यांनी केले.सचीन मदने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

