श्रद्धा आणि भक्तीभावाने विधियुक्त असा द्या बाप्पांना निरोप
सूर्यकांत जोशी कुडाळ – दरवर्षी दहा दिवसांसाठी प्रत्येक भक्तांच्या घरी पाहुण्या येणाऱ्या गणपती बाप्पांना आता उद्या मंगळवारी दि.१ रोजी निरोप द्यावा लागणार आहे. यादिवशी सकाळी ९.४० पर्यंत चतुर्दशी आहे. यावेळेत श्रींची उत्तर पूजा करावी. यथावकाश मूर्ती विसर्जन केले तरी चालेल.अर्थातच प्रथा आणि परंपरेनुसार बाप्पा कुणाकडे दीड दिवस, पाच दिवस सात दिवस मुक्काम करतात. तर उर्वरित घरगुती आणि सार्वजनिक मंडळाचे उत्सव मूर्ती श्री गणेशांना अनंतचतुर्दशीला निरोप दिला जातो.
दहा दिवस भक्ती आणि श्रद्धेने श्रींचे पूजन केल्या नंतर त्याच भक्तीभावाने आणि श्रद्धा पूर्वक निरोप देणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कोणतीही देवाची पूजा म्हंटल की त्या पूजेचा उत्तरपूजा हा विधी धर्मशास्त्रात आहे.थोडक्यात पूजेच्या निमित्ताने देवांना आपण मंत्र सामर्थ्याच्या माध्यमातून आवाहन करत असतो. म्हणजेच देवांचे त्या ठिकाणी आगमन होत असते.
देवांचे आगमन झाल्या नंतर यथाविधी त्यांचे पूजन करुन देवांना प्रसन्न करणे ही भावना मनामध्ये असते. या पूजा विधीत आपण कोणत्या कारणाने देवाना बोलावले आहे. आणि देवाकडून आपल्याला काय आशिर्वाद पाहिजे यासाठी यापूजेत संकल्प केला जातो. यथाविधी देवांची पूजा झाल्या नंतर देवांची पुन्हा विधीयुक्त पाठवणी करावी लागते आणि यालाच उत्तर पूजा विधी म्हणतात.
आपण यापूर्वी श्रींच्या पार्थिव मूर्तीची प्रतिष्ठापना कसे करायची हे गणेश चतुर्थी अगोदर समजून घेतले होते. आता श्री गणपती बाप्पांना विधीयुक्त निरोप द्यायला पाहिजे. कोणतीही पूजा म्हंटल की तनमन,शरीर, वातावरण शुद्धीकरण करावे लागते .आणि आपल्या मंत्र शक्तीत ते सामर्थ असल्याचे पुराणात ऋषी मुनींनी सांगितले आहे. अर्थात प्रत्येकाला च मंत्र म्हणणे शक्य नाही. किंवा तसा धर्म संकेत सुद्धा नाही. त्यामुळे देवाला आपली भोळीभाबडी श्रद्धा भक्ती सुद्धा भावतेच. तरी सुद्धा थोडी विधीयुक्त माहिती असल्यास आपल्या श्रद्धेला ठेच पोहचणार नाही. त्यासाठी श्रींच्या पार्थिव मूर्तीच्या विसर्जना पूर्वी उत्तर पूजा कशी करावी त्याबाबत थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे.
आपणास सर्व मंत्र म्हणणे शक्य नसले तरीही किमान पूजा करताना ‘ओम गंगणपतयेनम :’ या मंत्राचा जप करावा.तसेच आपणास येत असणारी श्रींची स्तोत्र कवने म्हणावी.व पूजा,आरती करावी.
श्री पार्थिव गणपतींचा उत्तरपूजा विधी
श्रींची स्थापना करताना ज्याप्रमाणे संकल्प केला होता त्याप्रमाणेच उत्तरपूजा विधी करताना सुद्धा संकल्प करावा.
पार्थिवगणेश उत्तरपूजा प्रारंभ:-
प्रथम कपाळी तिलक धारण करून कपाळावर अक्षता चिकटवाव्यात .देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत .घरातील पुरुष मंडळींच्या कपाळी कुंकुम् तिलक लावावा. महिलांनी हळदी कुंकू स्वतःला लावून घ्यावे.आणि पुजेला प्रारंभ करावा.कपाळी गंध अक्षता लावण्यासाठी मंत्र.
।।चंदनस्य महत् पुण्यंम् पवित्रं पाप नाशनंम् ।।आपदांम् हरते नित्यंम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा।।अक्षदा स्तुंडला शुभ्र कुंकुम् विराजित :
आचमन –
पुढे दिलेल्या 3 नावांचा उच्चार करून उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन प्यावे.
ओम केशवाय नमः,ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः*
चौथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे.*गोविंदाय नमः*
असे दोन वेळेस करावे.*
आपल्या ग्राम दैवत व इष्ट देवतांचे स्मरण करावे.
*श्रीमन्महागणपतये नम:॥*
*इष्ट देवताभ्यो नमः ||*
*कुल देवताभ्यो नमः ||*
*ग्राम देवताभ्यो नमः ||*
*वास्तु देवताभ्यो नमः ||*
*सर्वेभ्यो देवेभ्यो नम:॥*
*सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः।।*
*एतत कर्मप्रधान देवताभ्यो नमः।।*
अक्षता हातात घेऊन दोन पळ्या पाणी घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा
*श्रीमद्भगवतो महापुरुषस्य..शालिवाहनशके शार्वरी नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्दशां तिथौ भौमवासरे, धनिष्ठा दिवस नक्षत्रे,कुंभराशी स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये, धनु स्थिते श्रीदेवगुरौ, शुभपुण्यतिथौ….॥*
*मम आत्मन: परमेश्वर आज्ञारुप-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं………..गोत्रोत्पन्नः(स्वतःचे गोत्र म्हणावे) ……..नामक(स्वतःचे नाव म्हणावे) यजमानः अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां समस्त शुभफल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: ध्यानआवाहनादि उत्तर पूजन अहं करिष्ये॥*
असा संकल्प करावा व हातातील अक्षदा व पाणी ताम्हणात सोडावे.
नंतर हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येशु सर्वदा।।अनेन यथाज्ञानेन यथामिलीतोपचार द्रव्येः ध्यानावाहनादी पूजाराधनेन भगवान श्री गणपती देवता प्रियंताम् ।न मम ।ओम तत्सत ब्रम्हार्पण मस्तु ।।ओम गं गणपतये नमः।।
त्यानंतर श्रींच्या मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे व मूर्तीवर गंध, फूल, दूर्वा ,पत्री,अक्षदा वाहुन नेहमी प्रमाणे पूजा करावी.श्रींना उदबत्ती व निरांजन ओवाळावे. खिरापत,प्रसाद, मोदक व पंचपक्वानाचा नैवैद्य व दहीसाखर पोहे यांचा दाखवावा.आरती व मंत्र पुष्पांजली म्हणावी.
आता श्रींची दहादिवस पूजाअर्चा ,सेवा करताना आपल्या कडुन अनावधानाने काही चूक झाली असल्यास देवाची हातजोडून क्षमायाचना प्रार्थना करावी. ती अशी.
आवाहनं न जानामी ,न जानामी विसर्जनम्।पूजा चैव न जानामी क्षम्यतां परमेश्वर।।मंत्रहीनं क्रियाहिनं भक्तीहिनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देवा परिपूर्ण तदस्तु मे ।।गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्र्यमेव च ।आगता सुखसंपत्ती : पुण्योहं तव दर्शनात ।।अन्यथा शरनं नास्ती त्वमेव शरणं मम ।तस्मात कारुण्य भावेन रक्षस्व परमेश्वर ।।अपराध सहस्त्रानी क्रियंते हर्निशं मया ।दासो यामिती मां मत्वा क्षमस्व परमेश्वर।क्षमस्व परमेश्वर, क्षम्यस्व परमेश्वर।।यस्य स्म्रुत्याच नामोक्त्या तपा पूजा क्रिया दिषु।न्यूनं संपूर्णतः याती सद्यो वंदे तुमच्युतं।।रुपे देहि धनं देहि जयं देहि द्विषो जहि।पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामाश्च देहि मे ।।
त्यानंतर सर्वानी श्रीना साष्टांग नमस्कार करावा. त्यानंतर श्रींच्या मूर्ती जवळ ठेवलेल्या कलशावर विसर्जनाच्या अक्षदा टाकाव्यात व कलश उचलून जागेवर ठेवावा. काही जण कलशावर ठेवलेला नारळ श्रींच्यापुढे वाढवतात. किंवा अन्य नारळ फोडून साखर खोबरेची खिरापत करतात. त्यानंतर समयीवर अक्षदा वाहवून समय जागेवर उचलुन परत ठेवावी असे करताना उत्तीष्ठ उत्तीष्ठ उत्तीष्ठ असे म्हणावे.
त्यानंतर हातामध्ये अक्षदा घेऊन यान्तु देवगणाहः सर्वे पूजामाथवे इष्टकामार्थ सिध्यर्थं पुनरागमनायचः असे म्हणून श्रींच्या मूर्तीवर उत्तर पूजा व विसर्जनाच्या अक्षदा वहाव्या.या ठिकाणी मूर्तीमध्ये विराजमान देव पुन्हा लोकी निघून जातात. त्यामुळे ही केवळ एक मूर्तीच राहते.
त्यानंतर श्रींची मूर्ती यथाविधी वाहत्या पाण्यात विसर्जन करावी असे शास्त्र संकेत आहेत. परंतु आपल्या सोयीनुसार घरातील हौदात ,कुंडीत अथवा निर्माण सोयी प्रमाणे विसर्जन करावे.जर बसवण्यात आलेली मूर्ती घरातील कायम स्वरुपाची असेल तर त्यावर विसर्जनाच्या अक्षदा वाहू नयेत. ती मूर्ती पून्हा योग्य ठिकाणी ठेवावी.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पांना आनंदाने व भक्तीभावाने निरोप द्यावा. ।।गणपती बाप्पा मोरया.।।
सूर्यकांत जोशी कुडाळ
9146897069