सूर्यकांत जोशी कुडाळ –
आजची युवा पिढी “नवरा आणि बायको म्हणजेच संसार” या अतिशय संकुचित विचारात अडकताना दिसते आहे. संसार हा केवळ दोन व्यक्तींचा करार नसून, तो एका घरात असणाऱ्या सर्व माणसांचा, नात्यांचा, संस्कारांचा आणि परंपरांचा एकत्रित प्रवास असतो, हे भान कुठेतरी हरवत चालले आहे.
संसार म्हणजे सासरच्या घरात असणाऱ्या आई-वडिलांना आपले मानणे, त्यांच्या सवयी, रीतिरिवाज, रूढी-परंपरा समजून घेणे, आणि त्या घरात नवीन नात्याचं आदर, प्रेम आणि आपुलकीचं रोप रुजवणं. हे रोप एकट्याने नव्हे, तर संयम, समजूत आणि त्यागाने फुलतं. पण आजच्या उच्चशिक्षित मुली आणि त्यांचे आई-वडील हे सगळं विसरताना दिसतात, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं की, लग्न झाल्यावर मुलीला सासर म्हणजे परकं घर, बंधनं आणि अडचणी असं शिकवलं जातं. “तुला कोणी काही बोलू नये”, “स्वतःचं वेगळं बघ”, “आम्ही आहोतच मागे” अशा चुकीच्या शिकवणुकीतून संघर्षाची बीजं आधीच पेरली जातात. संसार सुरू होण्याआधीच तुटण्याची तयारी केली जाते. आज विवाहित जोडप्यांमध्ये वाढलेले घटस्फोटाचे कारण बहुतांश वेळा माहेरच्या चुकीच्या शिकवणीने होताना दिसून येते.
याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही महाभाग, स्वतःला फारच शहाणे समजणारे लोक, थेट “मुलाच्या आई-वडिलांचा काय संबंध? हा तर त्या दोघांचा प्रपंच आहे.”असेही म्हणण्याची हिंमत करतात. हा विचार केवळ अहंकारातून जन्माला आलेला नाही, तर तो आपल्या संस्कृतीच्या मुळावर घाव घालणारा आहे. आई-वडील नसते तर तो मुलगा नसता, आणि मुलगा नसता तर संसारच नसता — हे साधं सत्यही आज नाकारलं जात आहे.
मुलाच्या आई-वडिलांनी त्याला जन्माला घालण्यापासून ते त्याचं बालपण त्याला योग्य शिक्षण देऊन चांगल्या आर्थिक स्थितीत मध्ये आणून ठेवलेले असते त्यासाठी मुलाच्या आई-वडिलांनी काबाडकष्ट व त्याग केलेला असतो. हे सर्व केवळ मुला विषयीचे प्रेम आणि कर्तव्य ही भावना जरी असली तरी ती एक वृद्धापकाळची तरतूद असते.
आई-वडिलांना मुलाकडून दुसरी तरी काय अपेक्षा असणार त्यांनी काही वृद्धापकाळचे स्वप्न पाहिलेले असतीलच ना.जसे मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आई-वडील घेतात त्याचप्रमाणे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे त्यांच्या इच्छा अपेक्षांचा आदर करणे आणि त्यांचा वृद्धापकाळ आनंदात व्यतीत होणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान लाभणे हीच तर खरी त्या मुलांची कमाई व कर्तव्य असते. आणि त्यासाठी केवळ मुलगाच नव्हे तर सुनेचे सुद्धा तितकीच जबाबदारी राहते.
ग्रामीण संस्कृतीत संसार म्हणजे केवळ छताखाली राहणं नव्हे, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं होय. आजारपणात आईची माया, अडचणीत वडिलांचा आधार, सण-समारंभात सगळ्यांचा एकत्र आनंद — हाच तर आपल्या समाजाचा आत्मा आहे. तोच आत्मा आज हळूहळू गुदमरतो आहे.
या सगळ्या भांडणात, इगोच्या लढाईत आणि ‘मी आणि तू’च्या संकुचित जगात सगळ्यात जास्त भरडला जातो तो निरागस बालक. आई-वडिलांच्या भांडणात वाढणारी मुलं, आजी-आजोबांचं प्रेम न अनुभवणारी पिढी, आणि शेवटी एकाकी होत चाललेले वृद्ध माता-पिता
— हा कुठला विकास आहे?
शिक्षण मिळालं, पैसा मिळाला, स्वावलंबन आलं — हे सगळं मान्य.
पण संस्कार हरवले, नात्यांची किंमत राहिली नाही, तर ही प्रगती पोकळ आहे.
आज गरज आहे ती नव्या पिढीला हे सांगण्याची की— संसार चालवायला केवळ पगार नव्हे, तर संयम, आदर, समजूत आणि मोठ्यांचं मार्गदर्शन लागतं.
लग्न म्हणजे सुटका नव्हे, तर जबाबदारी आहे.
आणि सासर म्हणजे शत्रू नव्हे, तर दुसरं माहेर असतं.
वेळीच आपण थांबलो नाही, तर ही समाजव्यवस्था अशाच तुटक नात्यांच्या ओझ्याखाली कोसळत जाईल.
सुसंस्कृत समाज हवा असेल, तर नात्यांची मुळं घट्ट पकडावी लागतील, अन्यथा उद्याची पिढी नात्यांची नावंही फक्त पुस्तकात वाचेल.