Thursday, February 19, 2026
HomeTop Newsसहकारातील दीपस्तंभ – लालसिंगराव शिंदे काकांची शंभरावी जयंती अध्यात्मिक  वातावरणात साजरी

सहकारातील दीपस्तंभ – लालसिंगराव शिंदे काकांची शंभरावी जयंती अध्यात्मिक  वातावरणात साजरी


कुडाळ | प्रतिनिधी
दुर्गम, डोंगराळ आणि संघर्षांनी वेढलेल्या जावली तालुक्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात विकासाचा आशेचा किरण पेटवणारे माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांची शंभरावी जयंती नुकतीच अत्यंत भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली.
राजकारणातील स्वच्छ, निर्मळ आणि निरपेक्ष चारित्र्याची ओळख असलेले लालसिंगराव काका म्हणजे जणू चिखलातील कमळ—कठीण काळातही उजळून दिसणारे व्यक्तिमत्त्व.
आपल्या राजकीय कारकिर्दीत काकांनी कधीही पद, प्रतिष्ठा वा स्वार्थाला अग्रक्रम दिला नाही. उलट, सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांच्या हाताला निरपेक्ष भावनेने काम देत त्यांनी असंख्य घरांमध्ये स्वाभिमानाचे चूल पेटवली. त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा वारसा आज त्यांच्या नातवंडांतून पुढे जाताना दिसतो—विशेषतः सौरभ शिंदे यांच्या कार्यातून.
काकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत सौरभ शिंदे यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनाची वाटचाल सुरू ठेवली आहे. त्याच संस्कारांच्या शिदोरीवर उभे राहून, शंभराव्या जयंतीनिमित्त ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्या कीर्तनाचा भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कुडाळ परिसरातील २५ भजन मंडळांना भजनाचे साहित्य वाटप करून सामाजिक मदतीचा हातही पुढे करण्यात आला—हीच काकांच्या विचारांची खरी उजळणी ठरली.
कीर्तनातून बोलताना प्रवीण महाराज शेलार यांनी भावनिक शब्दांत सांगितले की,
“समाजाशी नातं जपणारी, माणुसकीची जाण ठेवणारी आणि सेवाभावाने चालणारी राजकारणाची वाटचाल—हीच लालसिंगराव काकांची शिकवण आहे. त्या वाटेवर सौरभ शिंदे ठामपणे चालले आहेत. ही वाटचाल त्यांना ध्येयप्राप्तीपर्यंत नक्की नेईल.”
शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने जावळीने केवळ एका नेत्याला नव्हे, तर मूल्यांना, संस्कारांना आणि सेवाभावाला अभिवादन केले—आणि त्या अभिवादनात काकांचा वारसा पुन्हा एकदा उजळून निघाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page