अजित जगताप सातारा दि : वाढत्या बेरोजगारीने अनेक जण कामाच्या शोधत असतात. काहींना काम जमत नाही.अडचणीत सापडतात, पण,अशा लोकांना कुडाळ ता जावळी येथून चिपळूणला सामंजस्याने त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्याचे काम रिपब्लिकन पक्ष(आठवले गट) यांनी केले. याबाबत माहिती अशी की, चिपळूण जि रायगड येथील काही बौद्ध तरुण उदरनिर्वाह करण्यासाठी कामाच्या शोधात होते, कोकणात आपण नारळ,फणस, आंबे काढतो, तशा पद्धतीने घाटावर ऊस तोडणीचे काम करू शकतो. असा समज त्यांनी करून घेतला होता. त्यानुसार जावळी तालुक्यातील सोनगाव येथील ऊस तोडणी मुकादमा कडून प्रत्येकांनी पैसे उचलले, तसेच ते कुडाळ भागातील बामणोली, आलेवाडी, महामुलकरवाडी, सोनगाव,आर्डे, बेलावडे, नेवेकरवाडी, खर्शी तर्फ कुडाळ,शेते, सोमर्डी,कोलेवाडी,सरताळे, म्हसवे, हुमगाव,आखाडे, येथील शिवारात जरडेश्वर साखर कारखान्यासाठी उभा ऊस तोडण्याचे काम करतील असे वाटले होते.परंतु, ऊस तोडणीचा पूर्व अनुभव नसल्याने त्यांच्या कडून अपेक्षित काम होत नव्हते,कसे तरी दिडशे टन ऊस तोडणी झाली होती. त्यानंतर वादावादी होऊन हे कामगार ऊस तोडणीचे काम सोडून पुन्हा चिपळूणला न सांगता निघाले होते, त्यांना महाबळेश्वर येथे अडवून पुन्हा कुडाळता जावळी येथील एका हॉटेल मध्ये ठेवण्यात आले. चार दिवस अवकाळी पावसामुळे ते जागीच अडकून पडले होते. ही बाब दापोली येथील रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रितम रुके यांनी सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना सांगितली, त्यांच्या सूचनेनुसार जावळी तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, दत्तात्रय जाधव, दशरथ कांबळे व संबधित ठेकेदार यांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शवली, त्यानुसार पैशाचा व्यवहार व केलेले काम, झालेला खर्च याचा ताळमेळ घालून उर्वरित पैसे ठेकेदारांना दिली या मध्ये कोणताही वाद झाला नाही. उलट, सामंजस्याने मार्ग काढून प्रश्न निकाली काढला, तसेच हे बारा तरुण चिपळूणला आपल्या घरी सुखरूप गेले. सध्या ऊस तोडणी कामगार वेळेत मिळत नाहीत. तसेच अवकाळी पावसामुळे उसाचे झालेले नुकसान अशा बिकट स्थिती शेतकरी व ठेकेदार व शेत मजूर, ऊस तोड कामगार सापडले आहेत, त्यांचा सरकारने विचार करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जावळी तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, विकास जाधव व कार्यकर्त्यानी केली आहे.