Tuesday, April 7, 2026
HomeTop News“सामाजिकतेची उबदार भेट; सौरभ बाबा शिंदें युवा मंच तर्फे ब्लॅंकेट वाटप”

“सामाजिकतेची उबदार भेट; सौरभ बाबा शिंदें युवा मंच तर्फे ब्लॅंकेट वाटप”



सूर्यकांत जोशी, कुडाळ :

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सर्वांचे लाडके युवा नेतृत्व श्री. सौरभ बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून एक अनोखी सेवा मोहीम राबविण्यात आली. ‘सौरभ बाबा शिंदे युवा मंच’ यांच्या वतीने कुडाळ व आसपासच्या भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना थंडीतील मायेची उबदार भेट म्हणून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. थंडीच्या प्रखर लाटेत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.

२३ नोव्हेंबर रोजी सौरभ बाबा शिंदे यांचा वाढदिवस असून,  सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. वाढदिवसा दिवशी अनेक हितचिंतक  शुभेच्छा देण्यासाठी येतात, गर्दी होते; मात्र सौरभ बाबांनी शुभेच्छांपेक्षा जनतेच्या आशीर्वादाला प्राधान्य देत गरजूंच्या घराघरात जाऊन उबदार पांघरूण देण्यास पसंती दिली.

स्थानिक नागरिकांनी यावेळी दिवंगत माजी आमदार शिंदे काका आणि प्रतापगड कारखान्याचे दिवंगत चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या समाजसेवेची परंपरा गौरविली. हाच सामाजिक वारसा जपत सौरभ बाबा जनसामान्यांच्या बांधिलकीतून कार्य करीत आहेत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

अत्यल्प कालावधीत अबालवृद्धांचा विश्वास आणि प्रेम जिंकण्यात सौरभ बाबांना यश मिळाले आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, तरुणाईला संघटित करणे आणि सामाजिक कार्याचा विस्तार करण्यातील त्यांची कौशल्यपूर्ण नेतृत्वशैली त्यांच्या भावी राजकीय वाटचालीला अधिक बळ देणारी ठरत आहे, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.

थंडीच्या दिवसात मिळालेला उबदार पांघरूण केवळ भेट नव्हे, तर मायेची ऊब होती. त्यामुळे सौरभ बाबांविषयी जनतेच्या मनात विश्वास, आपुलकी आणि सामाजिकतेची भावना अधिक दृढ झाल्याचे नागरिकांचे मत आहे. या युवा नेतृत्वाला सर्वसामान्य जनतेचे लाभलेले हे प्रेम व आशीर्वाद भावी राजकीय वाटचालीसाठी नक्कीच बळ देणारे ठरतील.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page