सूर्यकांत जोशी कुडाळ – लोकसहभागातून कुडाळ येथे बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या एक वर्षापासून बंद पडल्याने कुडाळ गावची सुरक्षा आता रामभरोसेच राहिली आहे.या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नसल्याने पोलीसाचीही याबाबत चुप्पीच आहे.वास्तविक मोठ्या लोकसंख्येच्या गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी व दुरुस्ती देखभालीसाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी मेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सपोनि.निळकंठ राठोड यांनी कुडाळ व मेढा यांसारख्या मोठ्या गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन लोकांना केले होते.कुडाळ येथे पोलीस दूरक्षेत्राचे पीएसआय संतोष चामे यांनी लोकसहभागातून सीसीटीव्ही यंत्रणा बसविली.तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते या यंत्रणेचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले होते.परंतू सुमारे दीड लाख रुपये खर्चून उभी केलेली सीसीटीव्ही यंत्रणा जेमतेम दीड वर्ष सुद्धा सुरू राहू शकली नाही.
वास्तविक सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून पोलीसांना चौकीत बसुन गावातील घडामोडी दिसत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होत असते.असे असले तरीही संबंधित विभागाकडे यासाठी निधीची कोणतीही तरतूद नाही.लोकसहभातून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली.पण दुरुस्तीसाठी निधी नसल्याने कुडाळच्या चौकाचौकात बसवलेले कॅमेरे आता शोपीस बनले आहेत.एकीकडे सीसीटीव्ही यंत्रणा बंद तर दुसरीकडे कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे.तसेच सक्षम पोलीसांची संख्या कमी आहे.त्यामुळे जावली तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या कुडाळच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.कुडाळची यात्रा आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे.यात्रेपूर्वी या यंत्रणा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सपोनि अमोल माने यांनी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे.