Thursday, February 19, 2026
HomeTop Newsसोनं : असुरक्षित अर्थव्यवस्थेचं आणि आंधळ्या मोहाचं प्रतीक                    * गुंतवणूक करा पण...

सोनं : असुरक्षित अर्थव्यवस्थेचं आणि आंधळ्या मोहाचं प्रतीक                    * गुंतवणूक करा पण सावध रहा *

सूर्यकांत जोशी कुडाळ –

                   भारतात “सोनं” हा शब्द उच्चारला की डोळ्यांत चमक येते. पण गेल्या काही वर्षांत सोन्याचा भाव इतका वाढला आहे की लोकांचा जीव अक्षरशः “खातोय”. खरं म्हणजे ही केवळ सोन्याची महागाई नाही, तर आपल्या अर्थकारणातील असुरक्षिततेचं आणि समाजातील आंधळ्या मोहाचं प्रतिबिंब आहे. आज अनेक जण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत आहेत परंतु ही भाव वाढ स्थिर राहील किंवा चढता आलेख राहील की शेअर बाजाराप्रमाणे कधी गडगडेल अशी शाश्वत परिस्थिती दिसत नाही त्यामुळे गुंतवणूक करताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे .

सरकारची आर्थिक अपयशं

         महागाईवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. महागाई वाढली की लोक सुरक्षिततेसाठी सोन्याकडे धाव घेतात. परंतु यामागचं खऱ्या समस्येकडे — उत्पादनातील घट, बेरोजगारी, आणि शेतीतील अस्थिरता — सरकारचं लक्ष नाही. उलट सोन्याच्या वाढत्या भावाकडे “जागतिक ट्रेंड” म्हणून दुर्लक्ष केलं जातं.

श्रीमंतांचा खेळ, गरीबांचा त्रास

             सोनं महाग झालं की फायदा कोणा होतो? श्रीमंत, व्यापारी आणि काळा पैसा साठवणाऱ्यांना. पण लग्नासाठी किंवा परंपरेसाठी सोनं घेणारा गरीब व मध्यमवर्गीय मात्र अडचणीत सापडतो. मुलीच्या लग्नासाठी सोनं जमवताना शेतकरी कर्जबाजारी होतो, नोकरदार माणूस बचतीतून तोड करतो. सोन्याचा भाव हा समाजातील आर्थिक विषमतेचा स्पष्ट आरसा आहे. सोन्यासारखी मुलगी मिळत असताना केवळ प्रतिष्ठा हाव आणि अहंकार म्हणून लग्न समारंभात माणसापेक्षा सोन्याला प्रतिष्ठा देणे योग्य नाही हे समाजाने जाणले पाहिजे.

सोन्याचा अंध मोह

              आपण सोन्याकडे केवळ गुंतवणूक म्हणून नाही, तर प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून पाहतो. “लग्न सोन्याशिवाय होऊच शकत नाही” ही मानसिक गुलामगिरी आपल्याला अजूनही आहे. त्याचा फायदा व्यापारी घेतात, सरकार अप्रत्यक्ष कर लावून आपल्याकडून महसूल उकळतं आणि बँका सोनं गहाण ठेवणाऱ्या ग्राहकांचा शोषण करतात. त्यासाठी परिस्थिती पाहून आणि पुढील आर्थिक गणित पाहूनच कर्जबाजारीपणा टाळला गेला पाहिजे.

जागतिक अस्थिरतेचा बहाणा

           सरकार व अर्थतज्ज्ञ नेहमी सांगतात की “रशिया-युक्रेन युद्धामुळे सोनं महागलं, डॉलर कमजोर झाल्यामुळे सोनं वाढलं.” पण खरा प्रश्न असा की — भारतासारख्या प्रचंड सोनं खरेदी करणाऱ्या देशाने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धोरणं आखली आहेत का? की फक्त आंतरराष्ट्रीय बहाण्यांआड आपली अपयशं लपवली जात आहेत.सोन्याचा वाढता भाव ही केवळ जागतिक अस्थिरतेची देणगी नाही, तर आपल्या समाजाच्या मानसिक गुलामगिरीची आणि सरकारच्या आर्थिक धोरणातील अपयशाची निशाणी आहे. अशी टीकाही आता तज्ञ मंडळी करत आहेत.

            जर आपण सोन्याला “देव” मानून त्याच्या मागे धावत राहिलो, तर उद्या सोनं महाग होणारच — कारण त्या लोभाला बाजारपेठ व सरकार दोन्ही खतपाणी घालत आहेत.खरं तर प्रश्न सोन्याचा नाही, तर आपल्या आर्थिक सुरक्षिततेचा आहे. आणि जोपर्यंत आपण सोन्याच्या आंधळ्या मोहातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत हा भाव आपल्याला खात राहणारच.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page