प्रसिद्धी माध्यमातून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त
सूर्यकांत जोशी कुडाळ – सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासाचा कणा असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्याना सध्या भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. जावली तालुक्यातील काही संस्थांचे चेअरमन आणि सचिवांची अभद्र युती झाली असून निरपराध शेतकऱ्यांच्या नावावर कर्जाचा डोंगर झाला आहे. याबाबत शेतकरी न्याय मिळावा यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमातून आपले गाऱ्हाणं मांडत आहेत या सर्व प्रकारणांचा छडा संबंधित विभागाने लावून सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा तसेंच दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीत सोसायटी चेअरमन व सचिवाना अनन्य साधारण महत्व असतें परिणामी या मंडळीना राजकीय वरद हस्त असतोच. त्यामुळे शेतकरी वर्ग दबावाखाली असल्याने तक्रार करत नाही. परंतु आता थकबाकीदारावर जप्तीच्या कारवाई सुरु असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. यातूनच हा आवाज उठताना दिसत आहे.यातील जे सत्य आहे ते जनतेसमोर येणे आवश्यक आहे.अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीसाठी विकास सेवा सोसायटी अगदी प्रभावी माध्यम असते.शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा होत असतो.अगदी अल्प दरात हा पतपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांनाही याचा फायदा होतो.मात्र सध्या परिस्थितीत जिल्हयात काही सोसायटीच्या बाबतीत वेगळाच रागरंग पाहायला मिळत आहे.कर्ज माफी प्रकरणात गोलमाल झाल्याच्चा आरोप सभासद करत आहेत.चेअरमन आणि सचिव दिलजमाई करत गावाला अंधारात ठेवून मालामाल होत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जावली तालुक्यात यापूर्वी आंबेघर भोगावली सोसायटी सचिवावर गुन्हा दाखल झाला आहे. तर सोनगाव,रानगेघर व दापवडी सोसायटी बाबतही शेतकरी सभासदांनी आवाज उठवाल्याचा व्हिडीओ प्रसिद्धी माध्यमातून झलकळे होते. शेतकऱ्यांनी न काढलेल्या कर्जाचे नोटीस हातात पडल्यावर मात्र अनेक शेतकरीही हवालदिल झाले आहेत. ही आर्थिक उलाढाल शेतकऱ्यांना फसवून होत आहे.याबाबात जावली तालुक्या बरोबरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम -कमलाकर भोसले
ग्रामीण भागात सगळीकडे विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पतपुरवठा होत आहे.यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज न घेताही, कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि बोगस कर्ज केलेली अनेक प्रकरणे समोर येत आहेत.लवकरच या सर्व प्रकरणांचा छडा लावून सर्व सामान्य शेतकऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.जर कोणी जाणीवपूर्वक स्वतः च्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत असेल तर त्याला योग्य धडा शेतकरी संघटना शिकवेल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर भोसले यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या आडून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न
गोपाळ बेलोशे
दापवडी सोसायटीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. आपणास बदनाम करण्यासाठी तसेंच एक प्रकारे ब्लॅकमेल करून आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी प्रसिद्धी माध्यमाला हाताशी धरून काहीजणांचा प्रयत्न सुरु आहे. ज्यांनी एक पतसंस्था बुडवून ठेवीदारांचे नुकसान केले. सभासदांचे समभाग परत केले नाहीत तेच संदीप पवार आज शेतकऱ्यांची दिशाभूल करून सचिवाना व सोसायट्याना बदनाम करत आहेत अशी प्रतिक्रिया दापवडी सोसायटीचे सचिव गोपाळ बेलोशे यांनी दैनिक ऐक्य प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आपल्या कडे तक्रारी संदीप पवार
ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे त्यांनी त्यांच्या व्यथा आपल्याकडे मांडल्या आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी बांधवाना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. संबंधित सचिवांचा कारभारपारदर्शक असेल तर त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. परंतु स्वतःचे पाप झाकण्यासाठी ते आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे जावे. अशी प्रतिक्रिया संदीप पवार यांनी दिली आहे.