सूर्यकांत जोशी कुडाळ- राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्द अनेकदा वापरला जातो, परंतु त्याचा अर्थ आणि मापदंड प्रत्येकाच्या सोयीने बदलताना दिसतो. पक्ष, नेता किंवा विचारधारा — कोणत्या गोष्टीशी खरी निष्ठा राखायची, हा प्रश्न आज अनेक कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात ही निष्ठा प्रत्यक्ष कसोटीवर चढते. काही कार्यकर्ते कुंपणावर असतात जिकडे संधी तिकडे ते पटकन उडी मारतात त्यामुळे येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांच्या उड्या कशा पडणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला आहे.
एरवी नेत्यांच्या पाठीशी धावत, त्यांच्या कार्यक्रमांत गर्दी करत, गाडीमागे धावणारे,बाईकवरून फेऱ्या मारत स्वतःला “नेत्याचे खरे कार्यकर्ते” म्हणवणारे अनेक जण निवडणुकीच्या वेळी मात्र वेगळा चेहरा दाखवतात. उमेदवारी, पद, संचालकपद, समितीतील संधी किंवा राजकीय अथवा आर्थिक लाभ न मिळाल्यास अनेकांच्या मनात असंतोष निर्माण होतो. काही जण आपल्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त करतात, तर काही स्वार्थासाठी विरोधकांचा पर्याय निवडतात.
खरी परीक्षा मात्र तेव्हाच लागते, जेव्हा मतपेटी समोर येते. प्रचाराच्या व्यासपीठावर पक्षाचा झेंडा हातात घेणारा कार्यकर्ता मतदानाच्या गुप्त कोपऱ्यात जाऊन कुणाला मत देतो, हे आता तंत्रज्ञानामुळे अधिक स्पष्टपणे जाणवते. ईव्हीएमच्या माध्यमातून प्रभागनिहाय मतदानाचे स्वरूप समजल्याने नेत्यांनाही आपला कार्यकर्ता किती निष्ठावान आहे हे ओळखता येऊ लागले आहे.
आज राजकारणात निष्ठा म्हणजे ‘पद मिळेपर्यंतच असणारी साथ’ इतकीच उरली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निष्ठा ही केवळ व्यक्तीशी नसून विचारधारेशी, जनतेशी आणि समाजहिताशी जोडलेली असावी, हे विसरले गेले आहे. जेव्हा कार्यकर्ता आपल्या स्वार्थापेक्षा पक्षाचा विचार पुढे ठेवतो, तेव्हाच ती खरी निष्ठा ठरते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ उमेदवारांची नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या निष्ठा, प्रामाणिकता आणि जनतेतील विश्वासार्हतेची कसोटी घेणाऱ्या ठरणार आहेत. राजकारणात टिकणारा तोच, जो निष्ठा ‘फायदा’ म्हणून नव्हे तर ‘कर्तव्य’ म्हणून जपतो.