

सूर्यकांत जोशी | कुडाळ
जावली तालुक्यातील हुमगाव व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला असून, भरवस्तीमध्ये घुसून पाळीव कुत्र्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते बुवासाहेब पिसाळ यांनी केली आहे.
हुमगाव येथील श्री. हरीश वाघमारे यांच्या घराच्या मागील बाजूस रात्रीच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला फाडल्याची धक्कादायक घटना घडली. याच परिसरातील शेतामधील महांगडे वस्ती येथे रामचंद्र महांगडे यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने उचलून नेताना प्रत्यक्षदर्शींनी पाहिले असून, ही घटना परिसरातील धोका किती गंभीर आहे याचे स्पष्ट संकेत देते.अशी माहिती पिसाळ यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी शेतात जाताना, रात्री उशिरा इकडे-तिकडे फिरताना तसेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करताना एकट्याने जाणे टाळावे, पालकांनीही सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या बिबट्याच्या वावरामुळे मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने तात्काळ पिंजरे लावणे, गस्त वाढवणे व प्रभावी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उशीर झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर पाहणी केली असता या परिसरात बिबट्या आल्याच्या किंवा सदरचे कुत्र्याची शिकार बिबट्यानेच केली असल्याचे खात्रीशीर सांगता येत नाही तसेच या कुत्र्यांचे शिकार अन्य प्राण्याने केली असावी असा संशय आहे या परिसरात बिबट्या असेलच असे पुरावे आढळले नाही. खात्री असल्याशिवाय कोणीही अफवा पसरवू नये नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.