Thursday, February 19, 2026
HomeTop News*म्हसवे गटात भाजपाचा बालेकिल्ला ढासळवण्याचे विरोधकांचे प्रयत्न*नामदार शिवेंद्रसिंहराजेंसमोर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे...

*म्हसवे गटात भाजपाचा बालेकिल्ला ढासळवण्याचे विरोधकांचे प्रयत्न*
नामदार शिवेंद्रसिंहराजेंसमोर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे थेट आव्हान उभे करणार?



सूर्यकांत जोशी | कुडाळ
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अभेद्य मानल्या जाणाऱ्या जावली तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात राजकीय आव्हान निर्माण करण्यासाठी विरोधकांनी एकीची वज्रमूठ आवळण्यास सुरुवात केली आहे. भाजपाविरोधात सर्वपक्षीय एकवटले, तर तालुक्यात तीन गट आणि  सहा गणातून उमेदवारांच्या अटीतटीच्या, रंगतदार लढती पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
भाजपाने या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी प्रस्थापित व मातब्बर उमेदवारांना मैदानात उतरवले असताना, विरोधकांकडून नव्या चेहऱ्यांना आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देत जनतेचा रोष भांडवलात रूपांतरित करण्याची रणनीती आखली जात असल्याचे दिसून येते.

म्हसवे गटात मानकुमरे यांना घेरण्याची व्यूहरचना
जावलीच्या राजकारणात गेली चार दशके वर्चस्व टिकवून ठेवणारे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे हे म्हसवे गटातील केंद्रबिंदू ठरले आहेत. नेतृत्व कोणाचेही असो, पक्ष कोणताही असो—मानकुमरे यांनी आपले राजकीय वजन अबाधित ठेवले आहे. हेच वर्चस्व मोडीत काढण्यासाठी विरोधकांनी एकास-एक सरळ लढत उभी करण्याचे संकेत दिले आहेत.
सध्या म्हसवे गटात मूळ ओबीसीतून अपक्ष संतोष शिराळे, राष्ट्रवादी (शरद पवार गट)कडून अशोक चव्हाण आणि शिवसेनेकडून संदीप पवार अशी त्रिकोणी स्थिती आहे. मानकुमरे व संदीप पवार यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी उमेदवारी मिळवल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी विरोधक एकत्र येऊन मानकुमरे यांच्याविरोधात सरळ लढतीचा उमेदवार ठरवतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, भाजपाचे उमेदवार मानकुमरे यांच्याविरोधात संदीप पवार यांनी नोंदवलेल्या आक्षेपावर उच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाल्याचे समजते. या प्रकरणाच्या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

शशिकांत शिंदेंचा ‘होम ग्राउंड’ म्हसवेगट
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा म्हसवे गट होम ग्राउंड मानला जातो. म्हसवे पंचायत समिती गणातून त्यांनी घरातीलच उमेदवार सौ. शिल्पा शिंदे यांना मैदानात उतरवले असून त्यांच्या समोर भाजपाच्या रेश्मा पोफळे यांचे कडवे आव्हान असणार आहे.
खर्शी–बारामुरे गणातून राष्ट्रवादीकडून विठ्ठल गोळे यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गोरख महाडिक हे प्रमुख उमेदवार असून, अन्य अपक्षांनी अर्ज माघार घेतल्यास येथे थेट सरळ लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या गणातून गेली पंधरा वर्षे भाजपाशी निष्ठेने कार्य करणारे श्रीहरी गोळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूरही ऐकू येत आहे. वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढतात की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

प्रचारात भाजपाची आघाडी, तरीही अनिश्चिततेचे सावट
म्हसवे गटात भाजपाकडून मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारयंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लागली असून उमेदवार निश्चिती लवकर झाल्याचा फायदा भाजपाला मिळताना दिसतो. भाजपाकडे नामदार शिवेंद्रसिंह राजेंचे दमदार नेतृत्व कार्यकर्त्यांची मोठी फौज, मंडलाध्यक्ष संदीप परामने व पक्षाचे प्रवक्ते सुरेश गायकवाड यांच्यासहविविध संस्थांचे पदाधिकारी यांची ताकद आहे.  दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांचा गेल्या दहा वर्षात तालुक्यातील जनतेशी काहीसा संपर्क तुटलेला आहे अशातच जुन्या ओळखी आणि जुन्या नात्यांना उजाळा देत  यांनी गेल्या तीन दिवसांपासून जावली तालुक्यात ठाण मांडत प्रत्येक गावागावात भेटी देऊन जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे.तरीही, विरोधकांचा एकमेव उमेदवार कोण असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्हसवे गटात मूळ ओबीसी मतदारांची संख्या सुमारे अडीच हजारांच्या घरात असून प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी लक्षात घेता केवळ ओबीसी कार्डवर विजय निश्चित होईल, असे गृहीत धरणे धोकादायक ठरू शकते.

गेल्या काही वर्षांपासून मानकुमरे आणि शिवसेनेचे संदीप पवार यांच्यात सुरू असलेला राजकीय संघर्ष अर्ज छाननीच्या दिवशी झालेल्या शाब्दिक चकमकीतून पुन्हा एकदा उफाळून आला . त्यामुळे शह–काटशहाच्या या राजकारणात मानकुमरे यांच्याविरोधात अखेर संदीप पवार, संतोष शिराळे की अशोक चव्हाण—यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशीच म्हसवे गटातील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतरच या लढतीची खरी दिशा ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page