जावली तालुक्यात यावर्षी १७५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना

सूर्यकांत जोशी कुडाळ – यावर्षी जावली तालुक्यात १७५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या वर्षी १७८ मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी दिली.
यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रभाव असला तरीही केवळ तीन मंडळांचा सहभाग कमी झाला आहे. तर जवळ पास शंभर गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला आहे. तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सपोनि निळकंठ राठोड यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या सर्व मंडळांनी नियम पाळुन गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात युवा वर्गाच्या सह सर्वांच्याच श्रद्धा आणि उत्साहाला उधाण येते. या दहा दिवसांच्या उत्सवात श्रींच्या आगमणा पासून विसर्जना पर्यंत दहा दिवस अगदी धामधूम असते. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांच्या कालावधीत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दरवर्षी रेलचेल असते. श्री गणपतीच्या आकर्षक व भव्य मूर्तींचेही खास आकर्षण असते.परंतू यावर्षी कोरोनामुळे सर्वांनीच आपल्या उत्साहाला आवर घातला आहे.अनेक मंडळांनी कोरोना बाबत जनजागृती करणारे देखावे उभे केले आहेत तसेच रक्तदान,सँनिटायझर व मास्क वाटप या सारखे सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
प्रशासनाच्या आवाहना प्रमाणे सर्वच मंडळांच्या श्री गणेशाच्या मूर्ती चार फूटांपेक्षा लहान आहेत. तालुक्यातील अनेक मंडळाच्या कायम स्वरुपी मूर्ती असून श्रींचे मंदीर आहे. दरवर्षी गणेशोत्वातील विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी ही मंडळे मोठ्या मंडपात श्रींना मिरवणूकीने आणून विराजमान करतात.परंतु यावर्षी या मंडळांनी मंदिरातच श्रींना प्रतिष्ठापित करुन मंदिराला विद्युत रोशनाई व फुलांची सजावट केली आहे. यावर्षी जरी जोश आणि उत्साहाला मर्यादा असल्या तरी सर्वांची भक्ती आणि श्रद्धा मात्र अपरंपार आहे.
तालुक्यातील युवकांनी दाखलेला संयम वाखाणण्याजोगा आहे. हाच संयम श्री गणपती विसर्जना पर्यंत कायम ठेवावा.असे आवाहन तहसीलदार शरदपाटील यांनी केले आहे.
आपल्या बेजबाबदार पणा मुळे आपण स्वतः, आपले कुटुंब व समाज अडचणीत येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. श्रद्धा व भक्तीभावाने हा उत्सव साजरा करावा. श्रींच्या आशिर्वादाने कोरोनाचे विघ्न लवकरच दूर व्हावे हीच प्रार्थना करावी.
👌👌👌