नवीन जीएसटी दरांचा आनंद घेण्याऐवजी, तुम्ही कंपन्यांच्या ‘फसवणुकी’चे शिकार ठरत आहात का?
केंद्र सरकारने २२ सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कराचे (GST) नवीन दर लागू केले. या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळून वस्तू स्वस्त होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे अनेक कंपन्या अजूनही जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देत नाहीत, उलट जुन्याच दराने वस्तू विकून ग्राहकांच्या खिशातून पैसे काढत आहेत.
३००० हून अधिक तक्रारींचा स्फोट!
या ‘नफाखोरी’मुळे देशभरातील ग्राहक संतप्त झाले आहेत. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे (National Consumer Helpline – NCH) यासंदर्भात ३,००० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. एका बाजूला सरकार दर कमी करते, आणि दुसऱ्या बाजूला कंपन्या ‘भ्रामक सवलती’ (Deceptive Discounts) जाहीर करून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : GST सुधारणा 2025 – काय बदल आहे आणि सामान्य जनतेवर त्याचा परिणाम काय?
सरकारने घेतला ‘अॅक्शन मोड’
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आता या सर्व तक्रारी कठोर कारवाईसाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डाकडे (CBIC) पाठवल्या आहेत.
जीएसटी दराच्या कपातीचा फायदा थेट ग्राहकांना मिळावा यासाठी सरकार आता अशा कंपन्यांवर करडी नजर ठेवून आहे.
तुमचे नुकसानीचे गणित तपासा:
तुम्ही नुकतीच कोणती वस्तू खरेदी केली असेल, ज्याचे जीएसटी दर कमी झाले आहेत, तर तुमच्या बिलावर कंपनीने योग्य दरात कपात केली आहे की नाही, हे त्वरित तपासा. जर तुम्हाला जुन्या दराने बिल आकारले गेले असेल, तर तुमची फसवणूक झाली आहे!
लक्षात ठेवा: तुमचा हक्क कसा मिळवाल?
जर तुमच्या दुकानदाराने किंवा कंपनीने तुम्हाला जीएसटी कपातीचा फायदा दिला नसेल, तर तुम्ही तातडीने तक्रार दाखल करू शकता.
टोल फ्री क्रमांक:
१८००११४००० किंवा १९१५ या क्रमांकांवर त्वरित कॉल करा.
ऑनलाईन तक्रार:
https://consumerhelpline.gov.in या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या साइटवर तक्रार नोंदवा.
WhatsApp/SMS: ८८००००१९१५ या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲपद्वारेही तुम्ही आपली तक्रार दाखल करू शकता.
या कंपन्यांना ग्राहक मंत्रालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे, जर तुमची फसवणूक झाली असेल, तर गप्प न बसता आपला हक्क मागा आणि लगेच तक्रार दाखल करा!