Friday, June 12, 2026
HomeTop Newsइतिहास संशोधकांच्या पंढरीत ‘शिंदे देशमुख कुडाळकर घराण्याच्या इतिहासाचे’ लोकार्पण : श्रीनिवास शिंदे...

इतिहास संशोधकांच्या पंढरीत ‘शिंदे देशमुख कुडाळकर घराण्याच्या इतिहासाचे’ लोकार्पण : श्रीनिवास शिंदे देशमुख यांच्या संशोधनातून इतिहासाला उजाळा.


सूर्यकांत जोशी,कुडाळ प्रतिनिधी : शिंदे देशमुख कुडाळकर घराण्याचा तसेच कुडाळ परिसर आणि परगण्याच्या अज्ञात इतिहासावर आधारित इतिहास संशोधक श्रीनिवास राजेंद्र शिंदे यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या  ग्रंथाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
         पुण्यातील ११६ वर्षांची परंपरा लाभ लेल्या भारत इतिहास संशोधक मंडळच्या ऐतिहासिक ‘इतिहासाचार्य वि. का. राजवाडे सभागृहात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मराठ्यांच्या इतिहास संशोधनाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत अनेक नामवंत इतिहासकारांनी संशोधन करून महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी कुडाळ परिसरातील अनेक ऐतिहासिक कागदपत्रे येथील संशोधकांनी संकलित करून प्रसिद्ध केली होती. त्याच परंपरेत पुन्हा एकदा कुडाळ व परिसराचा इतिहास याच ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रकाशित झाल्याने हा क्षण विशेष ठरला.
             या ग्रंथनिर्मितीसाठी गेल्या दहा वर्षांपासून श्रीनिवास शिंदे यांनी  सातत्याने संशोधन आणि परिश्रम घेतले . या कार्यासाठी श्री विलास शिंदे, श्री उदय शिंदे, श्री रवी शिंदे तसेच श्री राजेंद्र शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. तसेच संदीप शिंदे, शशी शिंदे आणि रोहित शिंदे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वपूर्ण योगदान देत खंबीर साथ दिली.
लोकार्पण सोहळ्यास कुडाळ येथील प्रतापराव शिंदे , माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, भाऊराव शेवते , अरुण किर्वे, अविनाश गोंधळी,प्रमोद वाठारे उपस्थित होते.यावेळी त्यांनी ग्रंथनिर्मितीसाठी झालेल्या संशोधनपर प्रयत्नांचे कौतुक करत लेखकांचा सन्मान केला.
            या सोहळ्यास दसपटकर शिंदे घराण्यातील चंद्रकांत शिंदे, सुशांत शिंदे, परशुराम शिंदे यांच्यासह अनेक भाऊबंद उपस्थित होते. तसेच मूळचे कुडाळकर असलेले प्रभाकर देशपांडे, श्रीरंग देशपांडे, योगेश देशपांडे, विश्वास देशपांडे आदी देशपांडे कुटुंबीयांनीही आवर्जून उपस्थिती लावली.
          कार्यक्रमास मुंबई, ठाणे, सातारा, पुणे, दसपटी, चोरवणे आदी भागांतील मान्यवर उपस्थित होते. विविध सरदार घराण्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये पायगुडे, माने, ढमाले, करंजावणे, पासलकर, गरुड, खोपडे, रणवरे, मोरे, सोनवणे, मोहिते, धुमाळ, सोळस्कर, पवार, निंबाळकर आणि हांडे घराण्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
            याशिवाय इतिहास संशोधक, अभ्यासक, मोडी लिपीचे तज्ज्ञ तसेच शिलालेख अभ्यासक यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. इतिहास संशोधकांच्या पंढरीत झालेला हा सोहळा इतिहास संशोधन आणि पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसा जतन करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page