सूर्यकांत जोशी | कुडाळ, 9421214450
नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून काढली आहेत. अनेक ठिकाणी काठावरचे बहुमत, तर काही ठिकाणी समान बलाबल अशी स्थिती निर्माण झाल्याने सत्तास्थापनेसाठी चुरस टोकाला पोहोचली आहे. अध्यक्ष व सभापती पदाच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग येउ लागला आहे. येणाऱ्या काळात अध्यक्ष व सभापतीच्या निवडी साठी राजकीय घडामोडींना वेगळे वळण लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषदेत अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपाला सुमारे सहा ते सात सदस्यांची अतिरिक्त साथ आवश्यक आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांकडे काठावरचे का होईना, पण बहुमत असल्याचे चित्र आहे. अशा तंग परिस्थितीत ‘घोडेबाजार’, ‘फोडाफोडी’, आणि ‘पळवा-पळवी’च्या घटना अनेक निवडणुकात घडतात . त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक पक्षाला आपले नवनिर्वाचित सदस्य सुरक्षितपणे सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असते त्याचबरोबर इतर पक्षातून कोणी गळाला लागते का ? याचीही चाचपणी करावी लागणार आहे.
भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असली तरी, वरिष्ठ पातळीवरील राजकीय डावपेचांच्या जोरावर भाजपा आपली ‘हुकमी चाल’ खेळून सत्ता हस्तगत करेल का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ता स्थापनेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत शह-काटशहाचे राजकारण रंगणार, हे निश्चित मानले जात आहे.
जावली पंचायत समितीची परिस्थिती तर अधिकच चुरशीची आहे. येथे भाजपा तीन, शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी एक अशा सदस्यसंख्येमुळे समान बलाबलाची स्थिती आहे. निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येत लढत दिल्याने सभापती पदासाठी काट्याची टक्कर होणार हे स्पष्ट झाले आहे. सभापती निवड चिठ्ठीद्वारे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र एखादा सदस्य गैरहजर राहिला, किंवा गैरहजर ठेवला गेला तर बहुमताचे गणित एका क्षणात बदलू शकते.
याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये मिश्किल चर्चा रंगली आहे — “नेत्यांनो, आपले विजयी सदस्य सांभाळा!” कारण सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी राजकीय तारेवरची कसरत सुरू झाली आहे. सदस्यांना एकजूट ठेवणे, त्यांना वेळेवर सभागृहात उपस्थित करणे आणि अंतर्गत असंतोष रोखणे ही मोठी कसोटी आता पक्ष नेतृत्वासमोर उभी राहिली आहे.
जिल्ह्यातील इतर अनेक पंचायत समित्यांमध्येही याच धर्तीचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येणारे काही दिवस सातारा जिल्ह्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत. सत्ता कोणाच्या हातात जाणार, यापेक्षा ती मिळवण्यासाठी कोणते डावपेच रचले जातील, याकडेच जनतेचे अधिक लक्ष लागले आहे.