

सूर्यकांत जोशी कुडाळ | ता. 9 :
कुडाळ जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून, पक्षनिष्ठा, विचारांशी प्रामाणिकता आणि सातत्यपूर्ण कामगिरी हाच उमेदवारीचा एकमेव निकष असावा, असा ठाम व एकमुखी ठराव कुडाळ येथे पार पडलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संमत करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ जिल्हा परिषद गटात कमळच फुलणार असल्याची ललकारी कार्यकर्त्यांनी दिली
लोकसभा, विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था—या सर्व पातळ्यांवर महाराज साहेबांच्या विचारांशी बांधील राहून काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी स्पष्ट भूमिका या मेळाव्यातून पुढे आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ गटातील सर्व जागा छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपाच्या झेंड्याखाली निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी भावनिक एकजुटीतून व्यक्त केला.
या मेळाव्यास कुडाळ गटाचे नेते सौरभ शिंदे, प्रतापगड साखर कारखान्याचे चेअरमन, संदीप परामणे (तालुका मंडल अध्यक्ष, भाजपा), मच्छिंद्र क्षीरसागर (माजी जि.प. सदस्य), हेमंत शिंदे (उपसभापती, जावली–महाबळेश्वर बाजार समिती), अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, मच्छिंद्र मुळीक, मनेष फरांदे, दादा पाटील, प्रदीप तरडे, हिंदूराव तरडे, समीर आतार (ओबीसी सेल अध्यक्ष), एकनाथ रोकडे (आरपीआय तालुका अध्यक्ष), अभिजीत दुदुस्कर (सरचिटणीस, भाजपा), गीताताई लोखंडे (महिला आघाडी), सुरेखाताई कुंभार (सरपंच, कुडाळ) यांच्यासह गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना सौरभ शिंदे यांनी विकासाचा ठोस लेखाजोखा मांडला. “कुडाळ गटात बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली पाचवड–आलेवाडी प्रमुख मार्ग, रायगाव–खर्शी ते सोनगाव काँक्रीटीकरण, आनेवाडी–वाघेश्वर नवीन काँक्रीट रस्ता, मोरावळे–मेढा हॅम रोड यांसारखी कामे मार्गी लागली आहेत. आजिंक्यतारा–प्रतापगड साखर उद्योगातून ऊस उत्पादक, कामगार व सभासदांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने राबवली गेली आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ही विकासाची वाटचाल स्थानिक स्वराज्य संस्थांत पुढे नेण्यासाठी तीनही उमेदवार बहुमताने निवडून देण्याची नैतिक जबाबदारी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मच्छिंद्र क्षीरसागर यांनी गटाची उमेदवारी मूळ ओबीसी—बारा बलुतेदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनाच मिळावी, तसेच सायगाव गणासह जि.प. उमेदवारीची संधी मेढा विभागातील ११ गावांना प्राधान्याने मिळावी, अशी भूमिका मांडली. “नामदार बाबाराजे जो निर्णय घेतील, त्यामागे आम्ही ताकदीने उभे राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
मच्छिंद्र मुळीक यांनी गट-तट बाजूला ठेवून एकमुखाने काम करण्याचे आवाहन करत, “कुडाळ गटाला लागलेला डाग पुसून काढू; आदरणीय शिवेंद्रराजे देतील त्या उमेदवारांसाठी आम्ही सर्वजण एकदिलाने झटू,” असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मोनालीताई बारटक्के, माधुरी गोरे, संदीप परामणे, दादा पाटील, गीताताई लोखंडे, हेमंत शिंदे, अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, मनेष फरांदे यांनीही भावनिक व धारदार मनोगते व्यक्त करत सर्व जागा निवडून आणण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ केला.
कुडाळ जिल्हा परिषद गटात भाजपाची निवडणूक रणनिती स्पष्ट आहे—निष्ठा, विचारांची शुद्धता आणि विकासाचा ठोस अजेंडा. याच बळावर आगामी निवडणुकीत भाजप सर्व जागा जिंकण्याच्या आत्मविश्वासात आहे.