Friday, April 3, 2026
HomeTop Newsकुडाळच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात  भुयारी मार्गाची आवश्यकता : एसटीची दुहेरी वाहतूक...

कुडाळच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात  भुयारी मार्गाची आवश्यकता : एसटीची दुहेरी वाहतूक बाजारपेठेतून सुरू करा: सुरेश भिसे : सभापती सौरभ शिंदे यांच्याकडून धाडसी निर्णयांची अपेक्षा


सूर्यकांत जोशी कुडाळ – केंद्र सरकारच्या हॅम योजनेतून  पाचवड- रत्नागिरी राज्य मार्ग निर्माण होत आहे. या महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. कुडाळ गावाबाहेर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये पाचवड ते रत्नागिरी आणि कुडाळ ते पाचगणी अशी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांच्या वेगवेगळ्या मर्यादा पाहता या ठिकाणी भविष्यात वाहतूक कोंडी आणि छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.त्यासाठी या चौकात कुडाळ ते पाचगणी कडे जाणारा रस्त्यावर भुयारी मार्ग असणे आवश्यक आहे.कोणतीही दुर्घटना घडून निष्पाप जीव प्राणाला मुकल्यानंतर पुन्हा अशी चूक सुधारण्यापेक्षा आत्ताच योग्य वेळी खबरदारी घ्यावी अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

                जावली पंचायतीचे नवनिर्वाचित सभापती सौरभ शिंदे यांनी आता जनतेच्या प्रश्नावर काही धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यांच्या कडे आवश्यक ते नेतृत्वगुण निश्चित आहेत. त्याचबरोबर घराण्याचा राजकीय वारसा आणि ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे भक्कम पाठबळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडून  काही निर्णय कटू असले तरीही समाज हिताला प्राधान्य देऊन धाडसी निर्णय घेतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
कुडाळ बाजार पेठेत अनिर्बंध पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा: पोलिसांचे  दुर्लक्ष
           कुडाळ बाजारपेठेत दुचाकी व चार चाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूने अत्यंत बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येतात. त्याचबरोबर काही भाजीविक्रेत्यामुळे सुद्धा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येते.त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी नेहमीच होते. अनेकदा या ठिकाणी छोटे मोठेअपघात व वाद विवाद होत असतात. तरीसुद्धा पोलीस यंत्रणा पार्किंग समस्या कडे दुर्लक्ष करत आहे.परिणामी एसटीची वाहतूक सेवा कुडाळ बाजारपेठेतून एकेरी सुरू आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेच्या उलाढालीवर होत असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे तसेच बाजारपेठेत माल खरेदी करून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हातान्हात बोजा घेऊन एसटी साठी गावाबाहेरील चौकात यावे लागते यामुळे आबालविरुद्ध व प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत तरी नूतन सभापती सौरभ शिंदे यांनी बाजारपेठेतील या समस्येवर विशेष लक्ष देऊन पार्किंग व्यवस्था शिस्तबद्ध होण्यासाठी तसेच एसटीची वाहतूक सेवा गावातून सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिसे यांनी केली आहे.
           सद्य परिस्थीतीत छत्रपति संभाजी महाराज चौक (पियूष ढाबा)ते इंदिरानगर येथे काम वेगाने सुरु आहे. पियूष ढाबा येथे पाचगणी व मेढा येथून पाचवडकडे जाणारी वाहने मूळ रस्त्यापासून वळविली आहेत. पण तेथे उतार असल्याने वळण घेताना अवजड वाहनांची अतिशय धोकेदायक अवस्था होते आणि त्याच ठिकाणी एस्. टी. च्या गाड्या प्रवाशांची चढ उतार करतात.  ते ठिकाण अतिशय धोकेदायक व अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे.
           गावातील गटारकामासाठी एस्. टी. ची गावात एकेरी वाहतूक सुरु आहे. परंतु गेल्या तीन महिन्यापासून बाजारपेठेतील गटर व रस्त्याचे काम ठप्प आहे. हे उर्वरित काम त्वरित पूर्ण होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे आवश्यक आहे. एखादा मोठा जीवघेणा  अपघात होण्या अगोदर एस्. टी. ची दुहेरी वाहतूक गावातूनच व्हावी.गावातील अस्ताव्यस्त वाहने उभी करणे सुधारु शकतो पण अपघाताचे काय ? असा खडा सवाल कुडाळ गावाचा एक सजग नागरिक म्हणून सुरेश भिसे यांनी प्रशासन व स्थानिक नेते मंडळींना केला आहे.      

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page